डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “पायातून बूटसुद्धा निघत नाहीये” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
– – इतके पाय सुजलेले!!
नेहमीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक विविध रस्त्याने जाते तशीच आमच्या टिळकरोडवरून गेली. (म्हणजे अजूनही चालूच आहे. आणि रांगेत अजून मागे इतके गणपती आहेत की कदाचित संध्याकाळ होईल संपायला!
तर दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांसाठी आमच्या ऑफिसची वॉशरूम खुली केली होती आणि आता पोलिसांनाही ते माहित झालं असल्याने ते स्वतःहून त्यांच्या महिला पोलिसांना आमच्या ऑफिसकडे पाठवतात.
आता ज्यांना माहीतच नाही की हे काय आहे? त्यांच्यासाठी सांगतो. विसर्जन मिरवणूक सुमारे तीस ते चाळीस तास चालते. आणि यासाठी पोलीस बंदोबस्त बाहेरच्या शहरातून पण मागवला जातो. मात्र त्यांना पुण्यातील तितकी माहिती नसते. विशेषतः महिला पोलिसांची “वॉशरूम” संबंधात मोठी कुचंबणा होते हे लक्षात घेऊन गेली काही वर्ष “मला जमेल तितकं मी करेल” यानुसार टिळक रोडवर अगदी फ्रण्टेजलाच ऑफिस असल्याने महिला पोलिसांसाठी ऑफिसची वॉशरूम तर ओपन करतोच पण शिवाय चहा बिस्किटे पाणी पण व्यवस्था केली जाते.
यंदा तब्येतीच्या काही कारणाने हे सगळं करावं की थांबवावं असं वाटलेलं.
मात्र हे पोलिसांना माहित नव्हतं त्यामुळे त्यांनी काल; संध्याकाळी दोन तीन महिला पोलिसांना ऑफिसवर पाठवलं. त्या बिचकत बिचकत आलेल्या कारण पुण्यात नवीनच होत्या.
मीही त्यांना आत यायला सांगितलं. आणि मनात म्हटलं की माझी ताकद, इच्छा असो नसो… हि सेवा बाप्पा करून घेतोय तर! त्यामुळे तयारीला लागलो. तिघीसाठी मस्त कॉफी तयार केली आणि म्हणालो
बसा हो थोडा वेळ! काय फरक पडत नाही. मी सांगतो वाटलं तर तुमच्या साहेबांना…
आणि त्यांना बसवून कॉफी बिस्कीट देऊन फ्रेश केलं
त्यातल्या एक म्हणाल्या, “दादा आजकाल कोण करत हो इतकं? गणेश मंडळाच्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याची फक्त काळजी… पण त्यांच्यासाठी आम्ही दोन दोन दिवस उभे… आमच्यासाठी फारसे कुणी काही करत नाही!
आपल्या व्यवस्थेवर मार्मिक बोट त्या भगिनेने ठेवलेले. मी तरी काय बोलणार?
म्हणालो की,,,,. जाऊ द्या… अडचणीत बाप्पाच उभा असतो तुमच्यासाठी म्हटलं!
आणि मग त्यांना सोडायला खाली फुटपाथवर गेलो तर तिथं एक महिला पायातून बूट काढण्याचा प्रयत्न करत होती पण कदाचित दीड दिवस बंदोबस्तवर असल्याने पाय सुजले होते. आणि त्यामुळे बूट काढताना त्रास होत असावा.
खरं सांगतो मंडळी माझ्याच डोळ्यात टचकन पाणी आलं.
त्यांना जवळ जाऊन म्हणालो,
ताई, वरतीच इथं माझं ऑफिस आहे. पाच मिनिट या. फ्रेश व्हा. पायाला थोडा आराम मिळू द्या!
त्याच्याशेजारी असलेला इन्स्पेक्टर बहुतेक मला ओळखत असावा. (सायबर क्राईम मध्ये काम करण्याचा फायदा)
तो तिला म्हणाला, “जा मॅडम… दहा मिनिट ब्रेक घ्या… हे (म्हणजे मी) आपलेच आहेत… ”
मग त्या मॅडम ऑफिसवर आल्या. एक पाय अनवाणी एका पायात बूट अन एका हातात बूट असं घेतलेल्या!!
त्यांना आधी बसायला सांगितलं. आणि माझ्याकडे स्वेलिंग स्प्रे (सूज आली तर त्यावर तो स्प्रे मारला तर सूज थोडी कमी होते) तो स्प्रे त्यांना दिला आणि सांगितलं की दोन मिनिट स्प्रे मारा पायावर! फरक पडेल!
त्याप्रमाणे त्यांनी केलं! दुसराही बूट त्यांनी काढला. दोन्ही पायावर स्प्रे मारला!
तोवर माझी कॉफी तयारच होती! त्यांना दिली.
त्यावेळी त्या माऊलीच्या डोळ्यात जे काही भाव उमटले ते सांगायला शब्द नाहीत माझ्याकडे…
मी फक्त नमस्कार केला! दुसरं काय करू शकतो?
पाच मिनिटांनी त्या उठल्या आणि म्हणाल्या, “घरी गेल्यावर मुलाला तुमच्याबद्दल नक्की सांगेल”
आणि शांतपणे ऑफिसवरून बाहेर निघाल्या!
त्यांनाही सोडायला खाली फुटपाथवर गेलो तेव्हा ते इन्स्पेक्टर पण तिथं होते! त्यांच्यासाठी ऑफिसातूनच एक पाण्याची बाटली नेलेली ती दिली!
त्यांनीही थँक्स म्हणत घेतली!
*
एक गाणं आठवलं
हीच आमुची पार्थना
अन हेच आमुचे मागणे
माणसाने माणसांशी
माणसासम वागणे!
*
बास इतकं केलं तरी वेगळी पूजा अर्चा अभिषेक करण्याची गरज नसते. बाप्पा सगळं पाहत असतोच.
यंदा एक जाणवलं म्हणजे “बापट इफेक्ट” नक्की झालाय
नाहीतर ऑफिसच्या खिडकीच्या काचा सुद्धा डीजे मुळे रात्रभर थरथरत असायच्या
यंदा तितक्या नाही थरथरल्या… आवाजावर बरेच नियंत्रण दिसले.
आणि अजून एक म्हणजे
आमचे समाजसेवी मित्र साहिल राणा याचा कालच निरोप आला की
“डीडी, ते महिला पोलिसांसाठी तुम्ही करता न ते मी पण यंदा कुमठेकर रस्त्यावर करतोय. वॉशरूमची सोय. तर कुणाला गरज लागली मला कॉल करा. मी करतो व्यवस्था सगळी! ”
त्याला म्हटलं अरेच्या, तुझ्या लक्षात आहे ते सगळं?
तो म्हणाला, अहो पक्के लक्षात आहे. दरवर्षी तुम्ही गेटवर बोर्ड लावता ते पण माहित आहे आणि गेल्यावर्षी कुणीतरी हुल्लड मुलाने बोर्ड फाडून टाकला होता त्यावर तुम्ही पोस्ट केलेली, ते पण माहित आहे!
*
मी चकित!! मनात म्हटलं, पेरत राहावं… कुठं तरी उगवत राहत असे माझे वडील सांगायचे ते खरं आहे तर!
टिळकरोडचा आमचा हा उपक्रम पाहून दोन वर्ष झाली सुभाषनगर (अभिनव कॉलेज चौक) येथील विनायक धारणे यांचे मंडळ तिथेही महिलांसाठी वॉशरूम सोय करत आहे
आणि आता यंदा कुमठेकर रोड पण सहभागी झाला!
बास… जीने को और चाहिये?
माझीच एक जुनी पोस्ट आठवली!!
ते उभे आहेत वर्दीत… म्हणून आपले सण साजरे होतात गर्दीत!
बाप्पा मोरया!! पुढच्या वर्षी नक्की या!
(फोटो सोर्स : जेमिनी एआय)
©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)
5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA
6) Mentor : Direct Action International – UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





