.श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “देशाला ‘परमवीर’ देणारे ‘प्रहार’ निर्माते… नाना पाटेकर!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

“साब, क्यों अपनी जान खतरे में डाल रहें हो? ” कमांडो प्रशिक्षण केंद्रामध्ये तैनात असलेल्या एका ज्येष्ठ सैनिकाने नाना पाटेकरांना हा प्रश्न विचारला तेंव्हा नाना पाटेकर नुसते हसले होते! आणि मग पुढे एवढंच म्हणाले होते, ”साब, आर्मी अफसर का किरदार निभाना है… वह सौ फिसदी सच ही लगना चाहिये… इसके लिये मैं सब कुछ करुंगा… जो यहां के जवान, अफसर करते हैं! ”

मोकळ्या मैदानात चौकोनी आकाराचा स्विमिंग पूलसदृश पाण्याचा साठा… खोली सुमारे १७ फूट. पाण्यात दोन टॉवर्स.. या दोन टॉवर्सदरम्यान सुमारे ५० फुट उंचीवर आडवी लाकडी फळी.. तिची रुंदी जेमतेम २४ इंच… काठावरून पाण्यात उडी घ्यायची.. पोहत टॉवरच्या लोखंडी उंच पाय-या भरभर चढत त्या लाकडी फळीवर पोहोचायचं… आणि तोल सांभाळत पुढे चालत जायचं… तिथंही काही पाय-या वर चढून पुन्हा खाली उतरायचं… डोक्यावर एक दोर लटकत असतो… त्या दोराला माकडासारखं उलटं लटकत दोराला पायांची कैंची करून धरायचं आणि हातांच्या साहाय्याने दोराच्या मध्यावर पोहोचायचं.. पाय अधांतरी खाली सोडायचं… शरीर स्थिर करायचं… आणि तिथून म्हणून सुमारे ६० फूट खाली सुमारे साडेसोळा फूट खोल असलेल्या पाण्याकडे एखाद्या लाकडाच्या सरळसोट ओंडक्यासारखं शरीर सोडून द्यायचं… पाण्यात पाय आधी शिरले पाहिजेत… पाण्यावर शरीर आपटलं तर एखाद्या खडकावर आदळल्यासारखं लागतो पाण्याचा मार. युद्धात पाण्यातून, उंच डोंगरावरून सैनिकाला पुढे जावं लागतं… पाण्याची, उंचीची भीती मनातून कायमची घालवण्यासाठी कमांडो कोर्स मध्ये ही लिडो किंवा लिओ जंप अतिशय महत्त्वाची असते!

नियमित लष्करी प्रशिक्षण घेणा-या सैनिकांसाठीही ही उडी एक आव्हानच ठरते… नाना पाटेकर यांनी अशा कित्येक उड्या अगदी न घाबरता घेतल्या होत्या! ते पाहून त्या ज्येष्ठ सैनिकाने काळजीच्या भावनेने त्यांना तो प्रश्न विचारला होता… कारण नाना काही नियमित सैनिक नव्हते! हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते आणि बहुतांश अभिनेते धोकादायक दृश्ये स्वत: सहसा देत नाहीत… DUPLICATE अर्थात BODY DOUBLE वापरतात… म्हणजे त्यांच्याऐवजी अन्य कुणीतरी ती कृती करतो मात्र चित्रपटात प्रेक्षकांना असं भासवलं जातं की त्या अभिनेत्यानेच ते साहसी काम केलेलं आहे!

पण इथं विश्वनाथ ऊर्फ नाना गजानन पाटेकर नावाचं वादळ येऊ घातलं होतं चित्रपटसृष्टीवर. प्रत्यक्ष सैन्यात भरती झालेला नसला तरी मनाने सैनिक असलेला हा तरुण भारतीय लष्करासंबंधी एक चित्रपट बनवू पहात होता.. त्यासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावण्याचा निश्चय केला होता. युद्धाची, लष्करी पार्श्वभूमी असलेले अनेक चित्रपट तोपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलेले होते… पण त्यात केस, पोट वाढलेले, नाजूक देहयष्टी असलेले कलाकार नकली अभिनय करताना पाहावे लागले होते.. अर्थात याला काही अपवाद होतेच. पण आपण चित्रपटात साकारणार असलेल्या मेजर चौहान नावाच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप होण्यासाठी नानांनी स्वत: नखशिखान्त मेजर चौहान होण्याचा निर्णय घेतला! भारतीय लष्कराला ‘घातक’ कमांडो देणारी प्रशिक्षण संस्था कर्नाटक राज्यात बेळगावी येथे स्थित आहे. लष्करी विषयावर चित्रपट बनतो आहे या विचाराने संरक्षण मंत्रालयाने नाना पाटेकर यांना या केंद्रामध्ये सराव, चित्रीकरण करण्यासाठी रीतसर परवानगी प्रदान केली. आणि पुढील तीन वर्षे नाना पाटेकर या प्रशिक्षण केंद्रात राहिले.. प्रशिक्षणात अन्य सैनिकांच्या, अधिका-यांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळत राहिले. अर्थात एका सामान्य नागरिक व्यक्तीला ते अत्यंत आव्हानात्मक प्रशिक्षण संपूर्णतया घेणं अशक्यच होतं.. पण नानांनी त्यातील बराचसा भाग आत्मसात केला. मात्र त्यांना अधिकृत ‘कमांडो’ म्हणून प्रमाणपत्र दिलं गेलं नाही… मात्र त्यांच्या प्रशिक्षणाचा उल्लेख असलेलं पत्र मात्र दिलं गेलं असावं.

बेळगावी येथे प्रशिक्षण सुरु असतानाच नाना ‘प्रहार’ चित्रपटाची कथाही लिहीत होते. सहकथा लेखक म्हणून सुजित सेन आणि हृद्य लाणी यांनी मदत केली. नानांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुधाकर बोकाडे यांना ‘प्रहार’ची कथा ऐकवली आणि त्यांनी हा चित्रपट निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली.. चित्रपट निर्माता चित्रपटाचा सर्व खर्च स्वत: करतो. या चित्रपटात नानांनी दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडलीच आणि मेजर चौहान यांची मध्यवर्ती भूमिकाही केली. त्यांच्यासोबत डिम्पल कपाडिया, माधुरी दीक्षित, मकरंद देशपांडे, गौतम जोगळेकर असे प्रथितयश आणि काही अगदीच नवखे कलाकार होते. क कुणालाही ‘मेकअप’ करण्याची परवानगी नव्हती.. अगदी डिम्पल किंवा माधुरी यांनाही! चित्रपटात सर्वकाही खरेखुरे असावे याकडे नानांनी कटाक्ष ठेवला. मूळचे नागपूरचे असलेले कर्नल सुनील देशपांडे हे मराठा लाईट इन्फंट्रीच्या काळी पाचवी बटालियनचे अधिकारी नानांच्या मदतीला होते. त्यांनी चित्रपटासाठी लष्करी सल्लागार म्हणून काम केले. त्यामुळे सर्वकाही अस्सल असावे, हे नानांचे उद्दिष्ट्य साध्य झाले. ब्रिगेडीअर चंद्रशेखरन साहेब हे त्यावेळी Maratha Light Infantry Regimental Centre (MLIRC) चे कमांडंट होते. त्यांनी या चित्रपटासाठी सहकार्य केल्यानेच या ठिकाणी चित्रपट चित्रित होऊ शकला. नानांनी काही दृश्यांत लष्करातल्या ख-याखु-या अधिकारी, सैनिकांना काही भूमिकेत दाखवलं. यात त्यावेळी लेफ्टनंट कर्नल आणि बेळगावीच्या प्रशिक्षण केंदात प्रशिक्षक असलेले व्ही. के. सिंग साहेबही होते. सिंग साहेब पुढे जनरल आणि लष्कर प्रमुख पदावर पोहोचले. ‘प्रहार’चे बरेचसे चित्रीकरण लष्करी केंद्रातच केले होते… तेथील सर्व नियम पाळून. यातून ‘Prahar-The Final Attack’ हा उत्कृष्ट चित्रपट तयार झाला!

कारगिल युद्धात आपल्या अतुलनीय पराक्रम गाजवून हुतात्मा झालेले आणि मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित झालेले मेजर विक्रम बात्रा साहेब त्यांच्या कुमारवयात हा चित्रपट पाहून खूपच प्रभावीत झाले होते… आणि त्यांनी भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचा निश्चय केला होता… आणि तसे ते झालेही होते. एका अर्थाने नानांनी देशाला एक ‘परमवीर’ मिळवून दिला!

‘प्रहार’ नंतरच्या पुढील तीन वर्षांत नानांनी भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेत रीतसरपणे प्रवेश मिळवला, प्रशिक्षण पूर्ण केले आणि ते १९९० मध्ये मानद कॅप्टन बनले. वर्षातून सहा महिने या सेनेतील सैनिक, अधिका-यांना लष्करी कर्तव्ये सोपवली जातात.

वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरु झाले. लष्करी बाणा अंगात भिनलेले नाना स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी सीमेवर जाऊन लढण्याची इच्छा जाहीर केली. नागरी व्यक्तींना तशी परवानगी मिळणे अशक्य होते. पण नानांनी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना गळ घातली… आपण लष्करी प्रशिक्षण घेतले असल्याचे पटवून दिले आणि विशेष बाब म्हणून त्यांना परवानगी दिली गेली… नाना सीमेवर जाऊन रुजू झाले. प्रत्यक्ष लढाईत जायची परवानगी त्यांना दिली गेलेली नसली तरी त्यांनी दुस-या फळीमध्ये राहून मोठी कामगिरी बजावली. लढणा-या सैनिकांना साहाय्य करणा-या QRT अर्थात Quick Reaction Team मध्ये नाना सक्रीय राहिले. सीमावर्ती भागांत रात्रीची सशस्त्र गस्त घातली. गरज पडली तेंव्हा लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांची सेवा-सुश्रुषा केली. यावेळी अनेक हिंदी चित्रपट कलाकार रुग्णालयांत जाऊन सैनिकांची केवळ सदिच्छा भेटी घेत असत, त्याच्या सचित्र बातम्या वर्तमानपत्रे, दूरदर्शनवर प्रसिद्ध होत असत. नाना पाटेकर यांना त्यात रस नसे.

नाना तब्बल साठ दिवस लष्करी कामगिरीवर तैनात होते… या काळात त्यांचे तब्बल वीस किलो वजन घटले होते. खंदक, तंबूमध्ये प्रत्यक्ष सैनिकांसोबत राहिल्याने, उंच पर्वतांवर काम केल्यामुळे नानांना सैनिकांना कोणत्या परिस्थितीत कर्तव्य पार पाडावे लागते, प्राणांचे बलिदान द्यावे लागते… हे जवळून पाहता आले. खरेखुरे सैनिक एक हिरो आपल्यासोबत आहे यासाठी आनंदी असत तर नाना ते स्वत: देशाच्या ख-याखु-या हिरोंसोबत आहेत, म्हणून त्या सैनिकांना प्रचंड सन्मान देत. या काळात नानांनी त्यांच्या वाट्याला आलेली सर्व कर्तव्ये पार पाडली… युद्धात काहीही होऊ शकले असते.. पण त्यांची देशासाठी प्राण देण्याचीही तयारी होती.

पुढील आयुष्यात नानांनी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत केली. तेरा वर्षे प्रादेशिक सेनेत सेवा बजावून लेफ्टनंट कर्नल (मानद) Lieutenant Colonel (Hon.) या पदावर असताना नाना सेवानिवृत्त झाले. लष्करी प्रशिक्षणादरम्यान रायफल शुटींग मध्येही प्राविण्य मिळवलेले असल्याने नानांनी पुढे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही रौप्यपदक प्राप्त केले होते.

भारतीय लष्कराबद्दल आत्यंतिक जिव्हाळा, प्रेम आणि अभिमान असलेले नाना पाटेकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. बाबा आमटे यांचा कुष्ठरोगी सेवा प्रकल्प असो की मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतक-यांची कुटुंबे असोत किंवा कुठलाही सामाजिक उपक्रम असो.. नानांचा हातभार लागलाच. आलिशान कार खरेदी करण्यासाठी जमा केलेले सुमारे दीड कोटी रुपये नानांनी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना वाटून दिले. गेली काही वर्षे स्वत:च्या मालकीच्या शेतात राबणारे नाना पाटेकर एक विशेष व्यक्तिमत्व होते यात शंकाच नाही. त्यांची चित्रपटातली, नाटकांतली कारकीर्द यशस्वी तर आहेच पण एक देशप्रेमी म्हणून त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात बजावलेली भूमिका अजरामर राहील, यात शंका नाही. ‘प्रहार’ चित्रपटाने त्यावेळच्या तरुणांना खूप मोठी प्रेरणा दिली, हेही खरेच.

विल्यम शेक्सपियरच्याHamlet नाटकात राजपुत्र Hamlet म्हणतो “What a piece of work is a man, How noble in reason, how infinite in faculty, In form and moving how express and admirable. ” And “yet to me, what is this quintessence of dust? ” अर्थात “निसर्गाने किती सुंदर माणूस घडवला आहे ना! त्याची विचारक्षमता, त्याची बुद्धी, गुण अद्भूत आणि अमर्याद आहेत. त्याचे शरीर किती देखणं आणि हालचाली मोहक. पण या माणसाची अंती राखच होऊन जाते! ” नाना पाटेकर याच विचारात जगले असावेत.

स्वत:च्या अंत्यसंस्कारांसाठी बारा मण लाकडं आधीच जमा करून ठेवणारा माणूस दुर्मिळच म्हटला पाहिजे.

जय हिंद.. लेफ्टनंट कर्नल (मानद) नाना पाटेकर (सेवानिवृत्त)… आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद.. जय हिंद की सेना. 🇮🇳

☆

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted