श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ श्रावण शीळ… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
शीळ घालुनी वा-या सांगे
श्रावण आला मेघ धारा
ऊन क्षणात मागे येती
हृदयी ओल्या स्मृती भरा.
*
नाचत झाड-वेली-फुले
हरित धरा घेती झुले
साद कोकीळी कुहू-कुहू
खळखळ झ-याशी बोले.
*
सोनेरी सप्त इंद्रधनू
मनात हर्ष नाद घुमे
ऐरावत जणू डोलतो
गगनी पक्षी भाव रमे.
*
पिवळ्या पानांची झड
ऋतू सावळा स्पर्श करी
रंगीत-संगीत निसर्ग
स्वर्ग अवतरे भुवरी.
*
पशू-गोचर होती तृप्त
जणू गोकुळी कृष्ण वनी
वाजे बासरी हळू कुठे
पर्वत सागरा भेट ऋणी.
*
मानव सुखी देव पुजा
स्वछंद भक्तीत मंदिरी
आला श्रावण कृपा धेनू
प्रेम आळवित अंतरी.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




छान कविता