सुश्री अरुणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ राया पावसात चला… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
(लावणी)
☆
आला आला पावसाळा त्यात निसर्ग नटला
शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥धृ॥
*
बीज अंकुराया आलं ओल्या मातीच्या पोटात
रोप इवलं पाहुनी हासू मायेच्या ओठात
गंध मातीचा घेताना मनी आनंद दाटला
शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥१॥
*
कसं फुललं वावर डोलतया हे शिवार
तन माझं शहारलं सख्या मला तू सावर
भुरभुरतो पाऊस जलधारा या हो आल्या
शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥२॥
*
घेऊ हातामंदी हात फिरू हिरव्या रानात
मन हिरवं हिरवं भिजू पाण्यापावसात
आला ज्वानीला बहर दाणा मोत्याचा भरला
शोभा पाहायाला जाऊ राया पावसात चला॥३॥
☆
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





छान लावणी रचना