सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “ते गंध रांगडे...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
☆
धुक्यात गेल्या अबोलवाटा ओलावुनि त्या स्मृती
स्पर्शात गंध जाणवे किती..
*
चंद्र नभीचा कधी खुणावे चमचमत्या चांदण्या
आरक्त शृंगारा सजविण्या…
*
सळसळ पानी शीळ वाऱ्यात थेंबात गळे कशी
ओल्यात होते वेडीपिशी..
*
का दुराव्यात क्षण हे वेचू माझे मला नकळे
संपले वाटता परत गळे..
*
ते क्षितिज उगा भासे उदास रंगात सोनसळी
मावळे गालावरची खळी…
*
वचनांना त्या वेढतो तमस मिटोनि त्या भावना
हुरहुरत झाकोळी कामना.. (का मना)
*
तू नसल्याचे दुःख मोडके उरावरी पेलते
खोटेच फूल दगडी खुलते..
*
त्या पुष्पांना नसतो सुगंध गडद रंग बेगडे
फांदीत झुले फक्त रांगडे
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




