श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३००
☆ जोखड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मानेवरती कायम येथे जोखड आहे
जगण्यासाठी तरी चालली धडपड आहे
*
सारे प्राणी गुलाम आणिक अल्ला मालिक
जनास प्यारा कुरबानीचा बोकड आहे
*
माय समजुनी काल पोसली गाय गोजिरी
कसाबास ती देऊ झाली भाकड आहे
*
कष्टकरी मी वतनदार तो ऐट मिरवितो
डोळ्यांवरती श्रीमंतीची झापड आहे
*
विहिणीसाठी केवळ मी तो तुपात तळला
तरी म्हणाली किती वाकडा पापड आहे
*
पिंडीवरती जल चढवावे भाव मनीचे
खांद्यावरती श्रम श्रद्धेची कावड आहे
*
रोकड म्हणजे जीवन आहे त्याच्यासाठी
माणुसकी सोडून वागतो हेकड आहे
☆
अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




