श्री विश्वास दाते
अल्प परिचय
- प्लांट हेड किंवा बिझनेस हेड म्हणून बऱ्यापैकी वरिष्ठ पदांवर अनेक वर्षांच्या कारकिर्दीसह भारत आणि परदेशातील उद्योगात पस्तीस वर्षे काम केल्यानंतर, 2005 मध्ये ते फिलिप्समधून चीनमध्ये निवृत्त झाले.
- सेवानिवृत्तीनंतर, १५ वर्षे, प्रगती लीडरशिप इन्स्टिट्यूट, पुणे, यांच्याशी संलग्न झाले. ४१ विविध व्यवसायांना, व्यवसाय सल्लागार, गुणवत्ता आणि व्यवस्थापन विकासामध्ये प्रशिक्षण आणि समुपदेशन सुविधा देणारा म्हणून मदत केली.
- त्यांचे इंग्रजीतील पुस्तक ‘Hi There! – माझ्या कॉर्पोरेट प्रवासातील कथा आणि विचार’ आता बाजारात असून कॉर्पोरेट् आणि शैक्षणिक संस्थांद्वारे, एक ‘लर्निंग गिफ्ट आर्टिकल’ म्हणून वापरले जात आहे.
- वेगवेगळ्या व्यवस्थापन संकल्पनांवर आधारित त्यांचे दुसरे कथांचे मराठी पुस्तक ‘नमस्कार, ऐकलत का?’ प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक विशेषतः लघु आणि मध्यम (SME) उद्योजक / व्यवस्थापकांसाठी आणि नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.
- ‘Friendly Stories’ हे काल्पनिक गोष्टींचे आणि ‘काजव्याचे कवित्व’ हे कविता आणि लेख असलेले, अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
- ‘Learning Management through Q&A’ आणि ‘संकोच’ ही दोन पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत.
- लेखक अभियांत्रिकीचा पदवीधर असून व्यवसाय व्यवस्थापनात पदविका घेतली आहे.
- वयाच्या ७९ व्या वर्षी, विश्वास, पुणे येथे, त्याच्या पत्नी, दोन विवाहित मुले आणि चार नातवंडांसह समाधानी जीवन जगत आहे.
कवितेचा उत्सव
☆ आणखी काय हवे जीवाला? ☆ श्री विश्वास दाते ☆
☆
झुकू लागले वय ऐंशीला
तरीही वाटे तरुण आजला
आणखी काय हवे जीवाला?
*
थंड झुळूक देते शिरशीरी
कितीतरी जरी काळ लोटला
आणखी काय हवे जीवाला?
*
हरदिनी सुचती नव्या कल्पना
मनी सदा आनंदाचा मळा
आणखी काय हवे जीवाला?
*
स्वप्नामधील सखी लाभली
मनसोक्त सहप्रवास झाला
आणखी काय हवे जीवाला?
*
चार जिने चढतोय सहजी
भरपूर चालता येतेय मजला
आणखी काय हवे जीवाला?
*
पाऊस येता सुगंध आला
पटकन जातो त्यात भिजायला
आणखी काय हवे जीवाला?
*
चिक्की दाणे चावू शकतोय
तयार असतो हॉटेलात जायला
आणखी काय हवे जीवाला?
*
मनासारखे काहीही खातोय
अजुनी आहे चव की भज्याला
आणखी काय हवे जीवाला?
*
मित्रांसंगे मारतोय गप्पा
मुले नातवे येती भेटायला
आणखी काय हवे जीवाला?
*
तासंतास वाचन करतोय
सिनेमे पाहायचा आहे लळा
आणखी काय हवे जीवाला?
*
मनात आले चालवतो स्कूटर
कार चालवायचा नाही कंटाळा
आणखी काय हवे जीवाला?
*
एक दोन जरी व्याधी असती
चिंता नाही त्यांची मजला
आणखी काय हवे जीवाला?
*
व्याज पुरेसे येई हाताला
कर भरतांना शांती मनाला
आणखी काय हवे जीवाला?
*
जुन्या आठवणी येती सारख्या
भविष्याची तरी चिंता न मला
आणखी काय हवे जीवाला?
*
कुतूहलाला जरी घालतो आवर
जग बघायचय अजुनी मला
आणखी काय हवे जीवाला?
*
स्वप्नामध्ये फिरून येतोय
पडल्या पडल्या लागतोय डोळा
आणखी काय हवे जीवाला?
*
झुकू लागले वय ऐंशीला
तरीही वाटे तरुण आजला
आणखी काय हवे जीवाला?
☆
© श्री विश्वास दाते
संपर्क – चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





काय हवे जीवाला!खरे आहे अगदी! नेहमी तरुण असणे किती छान!