सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “त्यादिवशी खरी दिवाळी असते…” ☆ भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

(मूळ हिंदी कविता – “उस रोज़ ‘दिवाली’ होती है” – स्व. अटल बिहारी बाजपेयी

मनात जेव्हा आनंद बहरलेला असतो 

चमचमत्या चांदण्या जणू मनात चमकत असतात 

घरभर फक्त आनंद भिरभिरत असतो  

एकाकीपणातही उत्सवाचा भास असतो  

आणि चहूकडे आनंद दरवळत असतो  

त्यादिवशी खरी दिवाळी असते…

*

जेव्हा अंतःकरणात प्रेमाचे दीप तेवत असतात 

स्वप्नं जेव्हा सत्यात उतरत असतात 

मनामनात सुंदर भावनांचा गोडवा असतो 

आशा-आकांक्षांचे ताटवे मनात डोलत असतात 

उत्साहाच्या लखलखाटाने मन उजळलेलं असतं 

त्यादिवशी खरी दिवाळी असते…  

*

जेव्हा मित्र प्रेमाने साद घालत असतात 

शत्रूलाही आपणहून गळाभेट दिलेली असते 

मनात जेव्हा कुणाबद्दलच वैरभाव नसतो 

सगळेच आपले वाटतात.. कुणीच परकं वाटत नसतं  

सगळीकडे ममत्वाची आभा पसरलेली असते 

त्यादिवशी खरी दिवाळी असते…

*

जेव्हा तन-मन-जीवन समाधानाने सजलेलं असतं  

सद्भावाच्या सुरांनी आसमंत व्यापलेला असतो  

सगळीकडे आनंदच आनंद दरवळत असतो  

सुखद आठवणींचा दरवळ गालातल्या गालात हसत असतो 

आसमंत जणू तृप्तीने तेजाळलेला असतो    

त्यादिवशी खरी दिवाळी असते…

हिंदी कविता – स्व. अटल बिहारी वाजपेयी

मराठी भावानुवाद –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments