सुश्री प्राची जोशी
कवितेचा उत्सव
☆ आकाशाची गर्द निळाई… ☆ सुश्री प्राची जोशी ☆
☆
निळ्याशार आकाशात माझ्या स्वप्नांचा कवडसा
हिरव्यागार धरतीवर अलगद आहे पहुडलेला
*
स्वप्नांची सोनेरी किनार तिचा जरतारीचा हा वेल
त्या वेलावर वसली आहे सुंदर फुलांची आरास
*
आराशीचा मनी माझ्या मी काठपदर विणला
चंदेरी काठपदरावर चमकतो सोनेरी जरीबुट्टा
*
त्यातील सजलेला बुट्टा दिमाखात आहे उभा
मिरवतो सुंदरतेचा वसा ठसला मनोमनी जसा
*
सुरेख वेल ही बुट्ट्यांची पसरली अशी धरतीवरी
जशी माझ्या स्वप्नांची नक्षी सजे पापणीवरी
*
बुट्ट्यांची साजिरी नक्षी हिरवीगार अन् मखमली
अशी पसरली धरतीवरी वाटे मज सुंदर गालीच्यापरी
*
सजलेल्या या गालीच्याची रंगबिरंगी अशी नक्षी
प्रत्येक फुलापानी दिसे मज स्वप्नांची माळ गुंफलेली
*
जशी या सोनेरी स्वप्नांची उतरली धरतीवर हिरवाई
तशी माझ्या नयनी दाटली आकाशाची गर्द निळाई…
☆
© सुश्री प्राची अभय जोशी
मो 9822065666
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





