श्री विश्वास दाते
कवितेचा उत्सव
☆ अखेरची भेट ! ☆ श्री विश्वास दाते ☆
☆
“असाध्य रोगामुळे येणाऱ्या अटळ मृत्यूमुळे आपल्या प्रियेपासून कायमचा दूर होणाऱ्या प्रियकराची त्याच्या प्रियेशी अखेरची भेट ”
*
अखेरची ही भेट आपुली सरती दिन राती I
*
आठवती मज आजवरीच्या सार्त नेत्रपल्लवी
राग तो अनुराग तो, अवीट ती गोडवी
फिरो काळ हा पुन्हा मागुती, रम्य नदी काठी l
*
येता अधिरी वसंतसेना, अधरी होशी लैला माझी
झालो होतो मीही तेंव्हा चारू मजनू स्वप्नांमाजी
क्षणोक्षणीचे विभ्रम तव ते अजून ताजे माझ्यासाठी I
*
अन्गांगातून तव दिसे मज मस्तानीची प्रतिमा ताजी
लगबग लगबग तू जाताना, होतसे ग दैना माझी
निरर्थ वाटे वियोग तेंव्हा, जग ते होते प्रेमासाठी I
*
रोहिणी तू चंद्र होतो या निळ्या तारांगणी
ग्रासिली डागांनी परंतु मधुर स्वप्ने मन्मनी
पुनर्जन्म जर येई मजसी, होईन गे सांगाती I
*
राहती जरी आज हाती शुष्क स्मृतींची ही फुले
गंध त्यांचा फिकट येता हळवे मन अजुनी फुले
विसरून जा तू, जातो मीही, मरते ना प्रीति l
☆
© श्री विश्वास दाते
संपर्क – चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




