सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ ऋतूंची फुलमाला… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
वसंत येईल राजा बनुनी,
चैतन्याने भरली अवनी!
नवसृजनाचे दालन उघडूनी,
नवल उमटले माझिया मनी! .. १
*
ग्रीष्म झळा त्या घेता भुवनी,
तगमग होई सजीव जीवनी!
शोधित जाई गारवाही मनी,
चाहूल घेई वर्षेची आंतुनी! .. २
*
वर्षे चा पहिला शिडकावा,
चराचराला देई गारवा!
वाट पाहतो ऋतू हिरवा,
दिसेल तेव्हा बदल नवा! .. ३
*
शरदाचे दिसताच चांदणे,
आनंदाला काय उणे!
चंद्र चकोरी नभात बघणे,
धरतीवर स्वप्नात रंगणे! .. ४
*
हेमंताची लागताच चाहूल,
पडे थंडीचे घरात पाऊल!
दाट धुक्याची घेऊन शाल,
निद्रिस्त राही निसर्ग विशाल! . ५
*
शिशिराची ती थंडी बोचरी,
पान फुलांना निद्रिस्त करी!
जोजवते आपल्या अंकावरी,
शांत मनोरम सृष्टी साजरी! .. ६
*
सहा ऋतूंची ही फुलमाला,
निसर्ग वेढीतो ती सृष्टीला!
प्रत्येक ऋतू बहरून आला,
अस्तित्वाने मनात फुलला! .. ७
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




