सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “मधुगंध...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
☆
गंध मधुवनी प्राजक्ताचा दरवळतो
हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।ध्रु।
*
शीत गुलाबी थंडी भिडते अंगाला
सख्या साजणा आतुरले त्या स्पर्शाला
अवचित पानी मधाळ वारा झुळझुळतो
हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।१।
*
पानगळीचा ऋतू हा दिसे नारंगी
साज धरेच्या शृंगाराचा बहुरंगी
तो वनीवनी सुमनी भुंगा गुणगुणतो
हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।२।
*
शाल धुक्याची हळूच सृष्टी पांघरते
दवात भिजता प्रणय भावना जाणवते
यमुना काठी नाद पैंजणी घुमघुमतो
हळूहळू हा शरद देखणा मोहरतो ।३।
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९, radhikabhandarkar@yahoo.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






