श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ दुभंग… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
सगुणाचा साकाराचा भक्त दिंडीत नाचतो
निर्गुणाच्या वारूळात मौन निराकार होतो
*
कधी औदार्याचा राणा कधी कार्पण्याचा स्वामी
भोगी कधी ऐहिकाचा कधी स्मशानाचा जोगी
*
हाच विदेही अनंत देहाचाही हाच बंदी
तोडी वज्राच्या शृंखला कुसुमांचा हाच कैदी
*
पोथ्यापुराणात शोधी यक्षप्रश्नांचे उत्तर
आरशात एक कोडे करी यास निरुत्तर
*
याचे उत्थान असीम याचे पतनही धन्य
मायामोही गुंतलेली मोक्ष भक्तीही अनन्य
*
पंचप्राणा भिडे याच्या दूर हाक श्रेयसाची
बेडी तूटता तुटेना पायातल्या प्रेयसाची
*
द्वैत अद्वैताचे द्वंद्व काही केल्याही सरेना
दोन्ही घरात क्षुधार्त दोन्ही लोकीचा पाहुणा
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






