श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक ध्रुव जणू लाखो तारे ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

शमवायाला अपुली तृष्णा

कुठवर घेशिल उसने पाझर

खणता खणता खोल स्वत:ला

लाभो तुजला तुझाच निर्झर

 *

आटपाटची अद्भुत नगरी

वसवलीस जी अंतर्यामी

सार्वभौम या अधिराज्याचा

तूच विधाता आणिक स्वामी

 *

खंत कशाला जनविजनाची

तूच तुझा जोवरी सोबती

नसु दे संगत नक्षत्रांची

ठेव आतली ज्योत जागती

 *

कालकूट रे सर्व नद्यांचे

रिचवाया तू समुद्र व्हावे

परी मंथनी तुझ्या अथांगा

केवळ अमृतकुंभ निघावे

 *

विदीर्ण होइल काळिज ऐसे

घोंघावत मरणाचे वारे

ठेव अबाधित तुझी अस्मिता

एक ध्रुव जणू लाखो तारे

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted