वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ महागाई… ☆ वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
पाहता पाहता
पेट्रोल, डिझेल वाढले
महागाईचे भूत उरावर बसले
खर्चाचा ताळमेळ बसेना
कारभार कसा चलवावा कळेना ?
झाली नोकरीत कपात
बसली लाथ कंबरड्यात
नाही सरकार जगू देत
नाही आई ती मरू देत
दात टोकरून पोट कधी भरतं ?
जगण्याच कोड अधिक बिकट होत
भाजीला मिळते तेल चमचाभर
खमंग फोडणीच स्वप्न उधारीवर
आधीच मान टाकली शाळूने
जेवणाशी कट्टी केली भाकरीने
दूधाने पण गाठली शंभरी
मुलेबाळे भुकेने तळमळली
भेटच होत नाही हातातोंडाची
सारखी गाठ पडते महागाईची
नाही धरला मोह श्रीमंतीचा
नाही धरला मोह पर्यटनाचा
नाही धरला मोह सोन्याचा
तरी
बट्ट्याबोळ झाला संसाराचा
☆
© वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
सांगली
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈




