श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ रात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
दमदार पावलांनी हळुवार रात आली
काळोख संपवाया या पेटवू मशाली
पेठेत आज इथल्या विकतात माणसे ही
करतात लोक काही चोरून ही दलाली
ज्याना घरात त्यांच्या काहीच वाव नाही
बदलून चेहऱ्याना फिरतात ते मवाली
आहेत मंद बुद्धी लाचार दास काही
म्हणतात मालकांची हळवी नवी कवाली
जिंकून जे आले ते झालेत आज राजे
गद्दार सर्व त्यांच्या जमलेत भोवताली
मागून रोज पाणी घायाळ लोक झाले
आल्या समोर त्यांच्या पण कोरड्या पखाली
देशात वैभवाच्या चालू किती वराती
जनतेस नाचण्याची संधी कुठे मिळाली
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





