श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३८
☆ डेटवर घेऊन चला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
माझ्यातल्या, दाखवीन एक एक कला
राया मला, डेटवर घेऊन चला
*
भिडवीत असता नुसत्याच नजरा
कधीच नाही तुम्ही, आणलात गजरा
नुसतं म्हणता, मला प्रीतीच्या फुला
राया मला डेटवर घेऊन चला
*
उगा नका घाबरू मी, त्यातली नाही
दरीत डोकावून, सारखाच पाही
मिळताच मोका, करू प्रेमाच्या लिला
राया मला डेटवर घेऊन चला
*
स्टेरिंग गाडीचं, करतंय वळवळ
घाटामुळे मला, होतेय मळमळ
गाडी कशी, नेहमीच लागते मला
राया मला डेटवर घेऊन चला
*
डोहाळे पुरवाल तुम्ही माझे सारे
दिवसाढवळ्याच पाहुयात तारे
असा तुम्ही, सजवून आणाल झुला
राया मला डेटवर घेऊन चला
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





