उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ सरता श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
आला सरता श्रावण
मना लागे हुरहुर
वर्षेची ती रिमझिम
अंगणात भुरभुर..
*
जाई पावसाची सर
भिजवीत अंगणाला
दिसे नभाच्या प्रांगणी
इंद्रधनुष्याची माला..
*
हिरवीगार ही सृष्टी
लोभवते क्षणोक्षणी
किमयाही निसर्गाची
भूल घाली मनोमनी..
*
सृष्टी गीत गाता गाता
जाई श्रावण पाऊल..
स्वागताला आतुरलो
लागता गणेश चाहूल…
☆
© उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






