श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ तो ऋतू कोणता असतो ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
शब्दांना पाझर फुटून काव्यपंक्ती वाहू लागतात
कल्पनांचे पंख लेऊन शब्दपक्षी मुक्तपणे विहरु लागतात
अलंकारांनी सजलेले शब्दसमुह सौंदर्याने मिरवत असतात
अर्थांचे गंध प्रवाहित करत शब्दांच्या पाकळ्या उमलू लागतात
.
तो ऋतू कोणता असतो ?
*
काना, मात्रा, वेलांटी ची लेणी लेऊन
अक्षरं शब्द रुपात सजू लागतात
मनातले भाव उचंबळून कागदावर टपटपू लागतात
सुखाची अनुभुती देणारा, दु:खावर उतारा ठरणारा
निर्मितीच्या सोहळ्यात नखशिखांत न्हाऊ घालणारा
.
तो ऋतू कोणता असतो ?
*
ऋतू चक्राच्या अस्तित्वाचे भान असून नसल्यासारखे करणारा
स्वतःच्या धुंदीत समाधिस्त होऊन सृजनाच्या क्षणांना कुरवाळणारा
आणि तरीही,
तरीही,
अतृप्ततेच्या डोहात स्वतःला शोधणारा
तो ऋतू कोणता असतो ?
.
सांगा ना, तो ऋतू कोणता असतो. ?
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप छान कविता पंडित सर!