सुनीता पाटणकर
कवितेचा उत्सव
☆ अंतरीचे शैशव… ☆ सुता पाटणकर ☆
लुटूपुटूची भातुकली,
खोटी भाजी अन पोळी।
घास भरवण्या आली आजी,
तू बाबा अन मी आई।।
*
मोठा खडू अन इवला फळा,
खेळू आपण शाळा, शाळा।
सवंगड्यांना गोळा करुनी,
तू मुलगी अन मी बाई।।
*
रचुया गड, किल्ले मातीचे,
कडकड नाद तोफांचे,
लुटूपुटूची करू लढाई,
तू शिवबा अन मी जिजाई।।
*
लपंडाव लपवी आंगणी,
विटीदांडू अन छापापाणी।
लंगडी, पळती, जोड साखळी
तू चोर अन मी शिपाई।।
*
बालपणाचा काळ सुखाचा,
असा संपूनी जाई।
अंतरीचे जपूया शैशव,
झालो जरी बाई अन आई।।
*
© सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




