मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “दिवाळी” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
दिवाळी आली.. दिवाळी आली.. आली दिवाळी आली…
तेजोमय ही वसने ल्याली.. मंगलमय अति सुभग पाऊली
आनंद उधळीत आली… आली.. आली.. दिवाळी आली – –
दारावरती तोरण अंगणी ताजी सडा-रांगोळी
अवतीभवती लखलखती.. सांगती पणत्यांच्या ओळी.. आली आली दिवाळी आली – –
पाऊल टाके जिथे जिथे ती.. समृद्धीला येई भरती
दीप उजळुनी तिची आरती.. करण्या सृष्टी सजली.. आली आली दिवाळी आली – –
…
दूर तिथे परि काय जाहले.. दिवाळीचे का पाऊल अडले
घुसमटलेले सावट आले.. जिवांची किती काहिली.. तेथे दिवाळी भांबावली
चोहीकडे दारिद्र्यची सांडे.. अज्ञानाचे जमले तांडे
मनातले ते मनात मांडे.. आयुष्यं काळोखली.. अन् दिवाळी जणू हरवली – –
वर्षांमागून वर्षे सरली.. दुभंगून जणू सृष्टी गेली
सधन-निर्धनामधली पोकळी.. वाढतीच राहिली.. तेथे दिवाळीही थबकली – –
…
देवा आज मागते एकचि…
करुणा कर अन् धाड झणी ती.. वर्षा मानवतेची..
अन् फुलू दे इथेही सुखदायी अशी.. हिरवळ समानतेची..
नकळताच मग विश्वबंधुता मनी जागवून.. तू मिटव रे ही पोकळी..
अन् येऊ दे रे इथेही दिवाळी – –
येऊ द्या इथेही दिवाळी – – –
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





