जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ मोहविणारे सारे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
(वृत्त – लवंग लता ८+८+८+४=२८)
☆
नदी वाहती काळी माती झुळझुळणारे वारे
हिरवी झाडी वाट वाकडी मोहविणारे सारे
*
पानोपानी सुंदर कोमल किती फुलांची दाटी
किलबिलणlऱ्या इवल्या इवल्या पक्षांची ती घरटी
*
गाणे गाते शिवार हिरवे धनधान्यांच्या राशी
गाय वासरे गोकुळ अवघे भासे मथुरा काशी
*
दूर डोंगरी शिखर मंदिरी भक्तीचा तो मेळा
संस्कारांचे ज्ञान दिले ती माय मराठी शाळा
*
पारावरती न्याय निवाडा सुधारणेच्या गोष्टी
अंगणातही मनामनांच्या संवादांची वृष्टी
*
गावाची मज ओढ लागते जातो वर्षाकाठी
थरथरणाऱ्या हातांचे ते आशिष घेण्यासाठी
*
सरळ मनाने खुल्या दिलाने आलिंगन मी देतो
मायेचा तो झरा गावचा कवेत मजला घेतो
☆
© जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





