श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
दोन थेंबांस महाग झालो मी,
रिक्त पेल्यास चढे माझी नशा |
सहवास एकमेकांचा लाभला,
पहावेना एकमेकांची ही दशा |
*
जीव त्याच पेल्यावर मी लावला,
त्यात शोधत राहिलो दहा दिशा |
पाठ साऱ्या जगानेच दाखवली,
त्याने दाखवली जगायची आशा|
*
सारं काही माझ्या हातून निसटले,
जगाने केला जीवनाचा तमाशा |
तरी डगमगलो नाही प्रसंगांना,
त्याने शिकवली संघर्षाची भाषा |
*
दिवसभर राबराब राबलो असा,
सुखमय केली त्याने माझी निशा |
क्षीण तनामनाचा दूर केला त्याने,
त्याच्या शिवाय न उरली मनीषा |
*
भले जग कितीही म्हणू दे आता,
हातून केली यानेच याची दुर्दशा |
का करू तमा मी स्वार्थी जगाची,
त्या पेल्याशीच जुळली भाग्यरेषा |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
28/01/26
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






सुंदर कविता आशिषजी