सुश्री ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– मनमुक्त मी…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
सुख स्वप्नांचे रंग मी
अंगावर पांघरले
फुलपाखरांचे थवे
सभोवती अवतरले ||
*
स्वप्नांची फुलपाखरे
मनी रुंजी घालतात
मनावरती हलकेच
मोरपीस फिरवतात ||
*
आनंदी घराची मी
सिद्धहस्त स्वामिनी
गृहसौख्य फुलविणारी
गृहदेवता भामिनी ||
*
मी सौंदर्याची राणी
आत्मानंदात रमते
माझे आत्मतत्त्व मी
मनमुक्ततेत जपते ||
*
मी देवाची निर्मिती
मी निर्मितीची खाण
सुख स्वप्नात सुद्धा
नसे कशाची वाण ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





