रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
नीलमणी ती मनमोहकशी…
रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(वृत्त : सूर्यकांत (समुदितमदना)
(मात्रा :८+८+८+३=२७ यति ८ व १६ व्या मात्रेवर)
☆
किती देखणी जांभुळलेली लतिका मज आवडे
नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||ध्रु||
*
सदाहरित ही वेल बहरते खरखर पाने किती
अखंड पाने फुले बहरती कधी न होते रिती
गगनभेदण्या भरभर भरभर उंच चालली गडे
नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||१||
*
हेमंत, शरद फुलव फुलवती वसंत झुलवी झुला
खार येउनी सरसर सरसर खाते साऱ्या फुला
मधमाशांना, चित्रपतंगा मधुघटची सापडे
नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||२||
*
खोड जणू हे पेड घातले वेणीचे साजरे
राणीचे पुष्पहार त्यावर लटकतात हासरे
फांदीवरती लखलखणारे नीलख भरले खडे
नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||३||
*
सुगंध त्यांचा मोहित करतो मन जाते ना तिथे
हरितांगावर नीलांबरसे पहा उतरले जिथे
समुदितमदना वृत्तामधले काव्य सुमंगल घडे
नीलमणी ही मनमोहकशी भुरळ मनाला पडे ||४||
☆
© रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






