श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “भरणी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

त्या वर्षी मंगळवारी भरणी श्राद्धाचा मुहूर्त निघाला होता. गावातल्या मोठ्या वाड्यात त्या श्रीमंताच्या आई-बापाच्या आत्म्यांना सदगती लाभावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वयंपाकाचा घाट घातलेला होता.

ओली बाळंतीण आणि गेली दीड दिवस उपवाशी असलेल्या शालिनीबाईला तो दिवस ठाऊक होता. नवरा दोन दिवस झालं कुठं पिऊन पडलाय, तिला शोधायला जाता येणार नव्हतं. तीन पोरांच्या पाठीवर चौथं बाळंतपण दोनच दिवसांपूर्वी तिच्या आईनं घरी येऊन करून दिलं होतं… आणि तिची आई तिच्या रोजगाराला गेली होती. गावातल्या लांबवरच्या दुस-या वस्तीत तर होतं शालिनीबाईचं माहेर.

… आज कुठं नाही काही मिळालं पोरांना तरी वाड्यात नक्की मिळेल, अशी तिची खात्री होती. वाड्यावरून सांगावा येईल याची तिने सकाळपासून वाट पाहिली. पण मोठी माणसं… त्यांच्यात पै-पाहुण्यांची गर्दी असेल, विसरली असतील निरोप द्यायला असं वाटून शालिनी वाट बघत थांबली… रात्रीच्या जेवणापर्यंत तरी कुणीतरी पितरं जेवायला पोरांना पाठवून द्या… असं सांगायला येईल… अशी आशा तिला होती.

घरात कुठल्याशा डब्यात दोन मुठी तांदूळ असतील पण ते करून देणार कोण? शरीराचं दुखणे बाजेवरून खाली उतरू देत नव्हतं… त्यात नवं बाळ अंगाला झटत होतं… आईच्या पोटातच काही नसल्यावर बाळाच्या ओठावर तर काय पोहोचणार? पण बाळ प्रयत्न सोडत नव्हतं… आणि आईच्या पोटात तर भुकेचा आगडोंब उसळला होता!

… शेजारी-पाजारी कुणी देतील असं नव्हतं. ते तरी कितीवेळा देणार? नवरा त्यांच्याशी भांडून बसलाय दारुच्या नशेत. आता कोणत्या तोंडाने काय मागायचं कुणाला? शालिनी गप्प राहिली… थोरल्या पोराकडून पाण्याचा तांब्या तेवढा भरून घेऊन जवळ ठेवला होता… भुकेसाठी पाणी तारक असतं… बुडू देत नाही जीवाला!

शालिनीची आई आज रात्री तर काय येऊ शकणार नव्हती. त्यात पावसाची रिमझिम दिवसभर सुरु होती. पोरांना तिच्याकडे पाठवायचं तरी कसं भिजत. वाटेने विचूकाट्याचं भ्या तर होतंच. आई जिथे रहायची तिथल्या मालकाचा कुत्रा होता भलामोठा… तो अंगावर यायचा पोरांच्या. नकोच ते.. शालिनी विचार करीत तळमळत राहिली.

दुपार उलटून गेली. पोरं भूकेकडे काणाडोळा करीत काहीबाही खेळत राहिली शेजा-याच्या अंगणात. संध्याकाळ सरली आणि रात्र होऊ लागली. आठ वाजता कुणीतरी बोलवायला आलं वस्तीत… पितरं जेवायला पाठवा पोरांना… असा निरोप आला. दुपारचा स्वयंपाक बराच शिल्लक असेल बहुदा. वाड्यातून मोठ्या लोकांना बोलावण्याचे निश्चित नसे. किती माणसं येतील कुणास ठाऊक… बहुदा सगळीच जात असत… म्हणून त्यांनी फक्त पोरा-सोरांनाच बोलावयाचा प्रघात पाडला होता.

शालिनी थोरल्याला म्हणाली, ”सोन्या, वाड्यातून येताना थोडं माझ्यासाठी आणशील का रे खायला! काकूला म्हणावं… आई बाळंत झालीय… भूक लागली आहे तिला… आणि तुझा बाप दोन दिवस झालं घरी आला नाही म्हणून सांग… त्या नाही म्हणायच्या नाहीत! “

शालीनीची तिन्ही पोरं आणि शेजारची तीन चार अशी मिळून सातजण गेले वाड्यावर. शालिनीच्या थोरल्या मुलाला मोठा प्रश्न पडला… मागायचं कसं त्या मोठ्या माणसांना. त्यात खिरीचं पातेलं तळाशी गेलेलं दिसलं… आज बहुतेक खीर लवकर संपली असावी. आणखी काही माणसं जेवायला यायची होती. त्यावर काकू सुनांना म्हणाल्या… ”खीर, आमटी संपत आलीये… परत करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तीच वाढा पातळ करून जराशी. आणि कुणाला घरी नका देऊ… अजून बरेच लोक यायचेत. उरलंच तर सकाळी नेऊन देऊ वस्तीवर! ” यावर सुनांनी माना डोलावल्या! शालिनीचा थोरला कसंबसं जेवला… भूकेपुढे काहीही गोडच लागतं… खीर पातळ असली तरी गोडवा होताच.

… त्याने हात धुतल्यावर घरातल्या बाईला म्हटलं… ”काकू, आईनं थोडं वाढून मागितलंय! ” त्यावर ती फणका-याने म्हणाली… ”आता बाकीच्या लोकांना काय वाढू मग? ते काय नाही… जो हाजीर तो वजीर. तुझ्या आईला म्हणावं… सकाळी पाठव कुणाला तरी… उरलं काही तर देईन! ” 

थोरल्या आधीच मुखदुर्बळ. लोकांकडे इतक्या वेळा मागण्याची वेळ आली होती आयुष्यात की आता त्याची लाज वाटू लागली होती त्याला. कधी एकदा मोठा होतोय आणि भाकरी कमवायला लागतोय असं झालं होतं त्या लहानग्या जीवाला.

पोरं घरी आली… शालिनी वाट पहात होती… पोरांच्या रिकाम्या हातांकडे बघून तिचा बांध फुटला! पोरानं लाजून मागितलं नसावं… तिला वाटलं. ती थोरल्याला नको तसं बोलली… जीव चाललाय भुकेनं इथं आणि याला लाज वाटतीय… आता काय माती खाऊ का? बाळाला दूध कसं पाजू?

थोरला आणि सर्वच मुलं रडू लागली… त्यांना आपण जेवून आल्याचं वाईट वाटू लागलं होतं.. पहिल्यांदाच. शालिनी तोंड लपवून रडत राहिली. बाळ तर केंव्हाचंच रडत होतं… भुकेनं!

रात्रीचे दहा वाजत आले होते. थोरला उठला… पायांत चपला असण्याचा संबंधच नव्हता… त्या नव्हत्याच घेतल्या कित्येक दिवसांत. तो थेट अंधारात चालू लागला… दगडधोंडे तुडवीत त्या गावाबाहेर दूरवर असलेल्या अंधा-या वस्तीकडे निघाला. वस्तीवरची कुत्री चाहूल लागताच भुंकू लागली… त्यात आजीच्या घरमालकाचं कुत्रं मोठं अफाट रागीट होतं… ते धावून आलं… थोरला मोठ्या आकांताने किंचाळू लागला… आणि झोपायला निघालेली वस्ती जागी झाली… नशीब मालक जागाच होता.. त्याने त्याच्या कुत्र्याला आवरलं… नाहीतर या पोराचा लचका तुटलाच असता आज.

शालिनीच्या आईनं फडक्यात घरात उरली होती ती दीड भाकरी आणि तिळाची चटणी बांधून घेतली आणि ती लगोलग शालिनीच्या घरी पोहोचली. त्या अंधा-या खोलीत त्या दीड भाकरीच्या चंद्राने मोठा उजेड पाडला… डोळ्यांतून आसवांच्या आणि उरातून दुधाची धार वाहू लागली… आई आणि बाळ… दोघांची भूक पौर्णिमेच्या चांदण्यासारखी आभाळभर पसरली होती.

शालिनीचा नवरा कधीतरी पहाटे येऊन अंगणात झोपला. त्याने येताना पोरांसाठी कसं कुणास ठाऊक खाऊचं एक पुडकं आणलं होतं… त्याला मुंग्या लागून गेल्या होत्या.

दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षे झाली. शालिनी आधी म्हणजे अहेव गेली. त्यामुळे घरी अहेव नवमी जोरात व्हायची. पुढे नवरा गेला आणि मग दोघांचे श्राद्ध एकत्रच करावे लागू लागले. बाईचं श्राद्ध नव-याच्या श्राद्धात उरकून टाकण्याची रीत पडली आहे… असेल काही कारण त्यामागे. पण पितृ म्हणजे एक अर्थ बाप असा असतो… आईचा क्रमांक बोलताना आधी केवळ.

.. थोरला आता खरोखरच मोठा झाला आहे. बहिणी लग्न होऊन सासरी गेल्यात. त्यांना तो भरणीसाठी आग्रहाने बोलावून घेतोच. त्यादिवशी नातलग नंतर जेवतात… वस्तीवर निरोप आधी जातो… जे जेवायला येऊ नाही शकले… त्यांच्यासाठी स्वयंपाक बांधून दिला जातो… नेहमीच!

… आणि… थोरला रात्री सर्वांत शेवटी जेवतो… त्याआधी वस्तीत जातो… एखादी शालिनी जेवायची राहिली आहे का? हे पाहून येतो!

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted