श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “तूच माझी दुर्गा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

हॉलमध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांची व्हीलचेअरवरचा सुधीर अगत्यानं विचारपूस करत होता.

काही वेळात सुधीरची बायको रोहिणी आणि मुलगी सई आल्या. सर्वांनी टाळयांच्या गजरात दोघींचे स्वागत केलं.

सर्वांना पाहून रोहिणीला आश्चर्याचा धक्का बसला.

“आई, कसं वाटलं सरप्राइज?” सईनं विचारलं.

“अहो, हे काय?”

“तुझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन.. ”… सुधीर 

“याची गरज नव्हती. उगीचच खर्च!!” … रोहिणी.

“वाढदिवस फक्त निमित्त आहे.” … सुधीर.

“पण.. कशासाठी?”

“आज पैशाचा विचार नको. हे सगळे जीवाभावाचे आहेत. ज्यांनी आपल्याला कठीण काळात साथ दिली. आधार दिला, मदत केली. त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून आजची पार्टी…”

“सईनं आग्रह करून सिनेमाला का नेलं ते आता लक्षात आलं.”… रोहिणीच्या बोलण्यावर सगळे मोठ्यानं हसले.

“अनपेक्षितपणे मिळालेले हे अत्यानदांचे क्षण फार मोलाचे आहेत. आता नेमकं काय वाटतंय हे सांगता येणार नाही पण छान!! सरप्राईज आवडलं. खूप खूप धन्यवाद!!” … रोहिणीनं हात जोडले.

“आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आभार!! खरं सांगायचं तर रोहिणीच्या वाढदिवस हे निमित्त.. खरंतर हा कार्यक्रम माझ्या पुनर्जन्माचा आहे.” … सुधीर.

“अहो, काहीही काय बोलताय?” … रोहिणी.

“आज बोलू दे… पाच वर्षांपूर्वी झालेल्या जीवघेण्या अक्सीडेंटमध्ये जीव वाचला पण आयुष्य पार बदललं.

हॉस्पिटलमधले दहा महीने फार भयंकर होते. वेगवेगळी ऑपरेशन्स करूनही तब्येतीत सुधारणा होत नव्हती. एकातून बरा झालो की दुसरं दुखणं सुरू व्हायचं. दवाखाना, बेड, औषधं, इंजेक्शन, डॉक्टर, नर्स, ही व्हील चेअर… एवढ्याच गोष्टी आयुष्यात राहिल्या. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आलो तेव्हा रोहिणी, सईची ओढाताण बघवत नव्हती… अनेकदा वाटायचं की गेलो असतो तर बरं झालं असतं. निदान दोघींचे हाल वाचले असते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. सगळी बचत संपली. डोक्यावर कर्ज झालं. राहतं घर सोडलं तर काहीही शिल्लक राहीलं नाही. जवळचे म्हणवणारे नातेवाईक, मित्र प्रत्यक्षात खूप लांब असतात हे संकटाच्या वेळीच लक्षात येतं. असो. रोहिणीनं एकटीने मॅनेज केलं.”

“अहो, स्वतःला आवरा. बास!! आता नको तो विषय.”

.. “रोहिणीची धावपळ, टेंशन सगळं समजत होतं. स्वतःच्या हतबलतेचा खूप राग यायचा. शांतपणे ती परिस्थितीचा सामना करत होती आणि मी निराशेपोटी आत्महत्येचा विचार करत होतो. माझा स्वभाव तापट, पटकन संतापतो. आजारपणात चिडण्याचं प्रमाण वाढलं. सगळा राग रोहिणीवर निघायचा. सतत चिडचिड, नाहीतर एकदम गप्प बसणं, मध्येच रडणं असं माझं चाललेलं.. हे सगळं सहन करत रोहिणीनं मला सावरलं. काळजी घेतली. घर, नोकरी, मुलीचं शिक्षण आणि परावलंबी नवरा अशा वेगवेगळ्या फ्रंटवर एकटी लढली आणि अजूनही ती लढाई चालूयं.” … खूप भरून आल्यानं सुधीर बोलायचं थांबला.

“अहो, आता पुरे झालं. जेवायला चला. सगळे खोळंबलेत”… रोहिणी.

“तुझ्या कष्टाची पुरेपूर जाणीव आहे. जाहीरपणे सांगतो की तूच माझ्या असण्याचं कारण. तूच सरस्वती, तूच सावित्री अन तूच माझी दुर्गा!! ” 

भावूक झालेल्या रोहिणीनं सुधीरचा हात हातात घेतला. तितक्यात सई केक घेऊन आली. तो कापल्यानंतर लखलखत्या पन्नास दिव्यांनी रोहिणीचं औक्षण केलं गेलं. बायकोला ओवाळताना सुधीर म्हणाला.. “शतायुषी हो!!, या जन्मात जमलं नाही पण पुढच्या जन्मात तुला खूप सुखात ठेवीन. यापुढं वटसावित्रीची पूजा आपण जोडीनं करायची.”

…. भरल्या डोळ्यांनी सुधीर म्हणाला तेव्हा रोहिणीचा बांध फुटला.. सई आई-बाबांना घट्ट बिलगली.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted