स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दोघी… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

शेणाचा सडा मंदिरासमोर टाकून आजी आत आली. “रांगोळी काढते का ग मने.. ? अशी हाक मारून आजीने चुलीतलं लाकूड जरा हलवलं आणि चहाचं आधण ठेवलं…

मनी लाल जास्वंदाचे फुलं तोडीत होती… आजीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, “काढते ना आजी माय… एक एक काम होऊ दे की… “

आजीने चहा गाळला आणि मनीकडे घेऊन आली.. मनीने हार गुंफायला सुरुवात केली होती… आजीने तिला चहा दिला आणि प्रेमानं तिच्या तोंडावरून बोटं फिरवून कडकड आपल्या कपाळावर मोडली. “बघ किती माया हाय तुझ्यावर… “

तशी मनी गहिवरून म्हटली, “तू माया करणारी होतीस म्हणून तर जगले ना ग या कठीण आयुष्यात, नाहीतर कधीच सम्पलं होतं आयुष्य… “

आजी म्हणाली, “आयुष्य संपणं आपल्या हातात असतं तर मी मेली म्हातारी कशाला जगत बसले असते.. ? अगं आयुष्य एवढं सहज नसतं संपत. मग ते आहे तेवढं हिमतीने मात्र जगावं आणि ते ही स्वतःच्या कर्तुत्वावर…

मने तुझी आई लवकर गेली पण तुझ्याकडे पाहून मी जगले… तुझा बाप आणि आजा अपघातात गेल्यावर तर वाटलं… आता आपण हाताने आयुष्य थांबवावं आपलं, पण तेंव्हा ह्या मंदिरातल्या पुजारीन बाईनं आधार मागितला, म्हणाली, “ह्या दुर्गेच्या पायी सेवेला राहा… नातीला शाळेत घालू आणि आपण सेवा करू एकमेकिंचा आधार होऊन… तिने परत जगण्याला दिशा दिली…

तू शिकली, लग्न केलं पण तुझं दुर्दैव, लोकं त्रास देणारे भेटले, तुला घरात कोंडून मारणारे, पण म्हणून अश्या लोकांसाठी आपला जीव देणं हा मार्ग असतो का ग? आयुष्य सम्पवण्याचा,.. ?

तू त्यादिवशी जर रेल्वेखाली सापडली असती ना मने, मग ह्या आजीने आयुष्य खुप दुःखात काढलं असतं… तेंव्हा मला वाटलं असतं… जगण्याचं, विचारांचं बळ मी तुला द्यायला विसरले…

तुझ्यासारखी खुप शाळेत गेले नसले तरी… ह्या पुजारीबाईनं वाचायला शिकवून मला पुस्तकं वाचायला शिकवली… त्यांच्या कपाटातली सगळी पुस्तकं वाचली मी तू लग्न करून गेल्यावर ह्या पाच वर्षात..

पुजारी बाई गेल्या तेंव्हा मला जवळ बोलवून म्हंटल्या होत्या, ‘मावशी, स्त्रीला कस्पटासमान समजणाऱ्या ह्या समाजात आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असतं… शरीर जपायचं असतं आणि स्वबळावर उभं राहायचं असतं… हे जमलं ना मग स्त्री टिकली…

स्वतःचं अस्तित्व ह्या दुर्गेने त्या काळात टिकवलं त्या महिषासुराला पायाशी लोळवून.. ह्या काळातही वासनेचे, अहंकाराचे, दुष्ट विचारांचे महिषासुर आहेत, त्यांचा वध करून सन्मानाने जगणं यावं स्त्रियांना हेच वाटतं मला, म्हणून तेंव्हा नवऱ्याने मुल होत नाही म्हणून टाकून दिली तरी ह्या दुर्गेने वाचवलं मला… स्त्रीशक्तीचं हे नातं ह्या संदेशातून जपत चला… ‘

पुजारीन बाई गेली पण मला उभं करून गेली… म्हणून तर तू रेल्वेखाली सापडली असती तर पुजारीन बाईने स्वर्गातून नक्कीच दुःख व्यक्त केलं असतं, नाती पर्यंतही माझा संदेश पोहचवला नाही म्हणून.. “

मनी म्हणाली, “आजी तू ह्या नातीला आज काय दिलंस हे मी शब्दात सांगू शकत नाही, पण एक मात्र खरं.. पैसा, दागदागिने ह्यापेक्षा खुप मौल्यवान असं विचारांचं बीज तू माझ्यात पेरलं… आजपासून सुरू होणारी ही नवरात्री माझ्या आयुष्यातील नवी सुरुवात असेल… ” एवढं बोलून मनी रांगोळी काढायला गेली…

मंदिरातली नवदुर्गेची मूर्ती आज अधिकच प्रसन्न भासत होती… महिषासुराचा वध करण्याचा खरा हेतू स्त्रीशक्तीत असाच पेरला जावो असा आशिर्वाद देण्या ती मंद हास्य करत उभी होती…

आजी मात्र नातीच्या रांगोळीत भरले जाणारे रंग कुतूहलाने बघत होती आणि मनात म्हणत होती.

“प्रसंग येवो किती कठिणही

स्त्रीशक्ती तू उभी राहा,..

एकमेकांना साथ देऊ हा

जगण्याचा वसा घेत राहा.. “

☆

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted