श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “जिनॉमिक्स” – लेखक : डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे – परिचय : डॉ. सुहास नेने ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : जिनॉमिक्स – मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा
– – – अद्भुत विज्ञान शाखेची सर्वांगीण ओळख
लेखक : डॉ. संजय गुप्ते, डॉ. अविनाश भोंडवे,
पाने : २८१
मूल्य: ४७५₹
जिनॉमिक्स मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि आजवर आरोग्यविषयक पंचवीस पुस्तकांचे लेखक, फैमिली डॉक्टर, तसेच आरोग्य विश्लेषक म्हणून सुविख्यात डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेले पुस्तक ‘ रोहन प्रकाशन’तर्फे नुकतेच प्रकाशित झाले.
जिनॉमिक्स किंवा जनुकशास्त्र या जीवशास्त्राच्या उपशाखेत, एखाद्या जीवाच्या सर्व जनुकांचा (जीन्सचा) आणि त्यातील डीएनएच्या संपूर्ण रचनेचा, कार्याचा, विकासाचा आणि रोगांशी असलेल्या संबंधाचा अभ्यास केला जातो. जिनेटिक्स किंवा अनुवंश शास्त्र, हे एखाद्या विशिष्ट जनुकाचा वैयक्तिकरीत्या अभ्यास करते. जेम्स वॉट्सन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी लावलेल्या डीएनएच्या दुहेरी हेलिक्सचा शोध हा या क्रांतीचा पाया होता. जिनॉम मॅपिंग, क्रिस्पआर सिस्टीम, क्रिस्पआर-एसकेपी प्रक्रिया हे या पायावर बांधलेले वरचे मजले आहेत. कृत्रिम मानवी जिनॉम तयार करण्याचे तंत्र, म्हणजे सिंथेटिक जिनॉम प्रोजेक्ट, हा त्याचा कळस आहे. कुणी सांगावे, आयव्हीएफमुळे, कस्टमाईज्ड, डिझायनर बाळसुद्धा अगदी मनाला हवे तसे, प्रयोगशाळेत तयार करता येऊ शकेल आणि तेदेखील मातेच्या आयुष्यातल्या कोणत्याही वयात. या सर्व प्रगतीचा आढावा सोप्या भाषेत या पुस्तकात घेतला आहे.
जनुकीयशास्त्राची सारी मदार जिनॉमवर असते. जिनॉम या सहा अब्ज (तीन अब्ज जोड्या) अक्षरांनी सजलेला, अगणित पानांचा ग्रंथ आहे. ४६ गुणसूत्रे ही त्यातील प्रकरणे आहेत. जीन्स किंवा जनुके ही त्यामधील वाक्ये आहेत आणि बेसेस, न्यूक्लिओटाईड किंवा कोडॉन हे त्यामधील शब्द आहेत. जिनेटिक्सची मूळाक्षरे गिरवताना या पुस्तकात जीनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची प्राथमिक ओळख, डीएनएचे कार्य, अनुवंशिकता, उत्परिवर्तन, आनुवंशिक आजार, जनुकीय चाचण्या, त्यांची आवश्यकता, डाएट अशा विविध विषयांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. जिनॉमिक्सचा केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर शेती, शिक्षण, आहार, क्रीडा आणि गुन्हे अन्वेषणशास्त्र या क्षेत्रात कशा रीतीने कायापालट होतो आहे, याबद्दल या पुस्तकात सविस्तर भाष्य केलेले आहे.
सर्व जगाला भेडसावणाऱ्या कर्करोगाबाबत, कर्करोगाचे जीवशास्त्र उलगडून सांगत आणि या विषयाशी संबंधित मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
जनुकीय चाचण्या जनुकीय विकारांसाठी आवश्यक आहेत, असे सांगितल्यानंतर त्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध चाचण्या, त्यातही पारंपरिक व खास प्रगत तंत्रज्ञानातील अशी विभागणी करून प्रत्येकातील फायदे तोटे विशद केले आहेत.
जनुकशास्त्राच्या इतिहासात दीपस्तंभासारख्या असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची नावे घेऊन त्यांना मानवंदना द्यायला लेखक विसरलेले नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीने, स्तनाच्या कर्करोगाबाबत, जनजागृती आणि लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या कृतीचे कौतुकही ते करतात. ‘जन्माला येणाऱ्या बाळाचे लिंग, पुरुषाच्या गुणसूत्रावरच ठरत असते’, हे स्पष्ट करताना मुलीला जन्म देणाऱ्या मातांना त्रास देणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीला फटकारायला लेखक मागेपुढे बघत नाहीत.
कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही जिनॉमिक्सच्या विश्वात भरारी घ्यावीशी वाटावी, अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केल्यामुळे पुस्तकाचा आवाका वाढतो. सर्वांना समजेल, रुचेल अशा रोजच्या व्यवहारातील उदाहरणांनी, उदा. मांजा फिरकीभोवती गुंडाळलेला असणे, स्वतंत्र कार्यालय, विभागीय कार्यालय, सैनिकांचे हुद्याप्रमाणे रांगेत उभे राहणे, लाकडी पट्टीत ठोकलेले खिळे, समजावून सांगितले असल्यामुळे ते मनात ठसते.
मूळ इंग्रजी शब्दांचे ओढूनताणून मराठीत भाषांतर करण्याचा सोस टाळल्यामुळे मजकुरातील क्लिष्टता कमी झाली आहे. ठिकठिकाणी दिलेल्या आकृत्यांमुळे आणि तालिकांमुळे स्पष्टीकरणास पुष्टी मिळते. अवघड शब्दांची शब्दसूची दिल्यामुळे त्याबद्दल विशेष माहिती मिळविणे सोपे जाते.
मुखपृष्ठावरील रंगसंगती, उचित शब्दरचना आणि नागमोडी शिडीसारख्या डीएनएच्या चित्राने पुस्तकाबद्दलची उत्सुकता शिगोशिग वाढली आहे आणि जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा नक्की उलगडावा, असे वाटल्यावाचून राहत नाही.
समजण्यास अवघड असा हा विषय सरळ, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत मांडून, या अद्भुत विज्ञान शाखेचा अनोखा खजिना लोकांसाठी उपलब्ध करून दिला, याबद्दल डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे ही लेखकद्वयी अभिनंदनास पात्र आहे. यामुळे सर्वसामान्यांमधील जनुकीय शास्त्राबद्दलची भीती, अज्ञान आणि गैरसमजुतीची दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल याची खात्री वाटते.
पुस्तक परिचय: डॉ. सुहास नेने
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




