श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “अवकाश.. शोध अंतराळाचा” – संपादक : निखिल विद्याधर पंडितराव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : अवकाश … शोध अंतराळाचा
संपादक : निखिल विद्याधर पंडितराव
पृष्ठ : २००
मूल्य : २४०₹
पृथ्वी भोवतीचे अवकाश… अथांग पोकळी… गूढ… विस्मयकारी… कुतूहल जागवणारी… अभ्यासक, संशोधकांना खुणावणारी… अब्जावधी वर्षांचं संचित सोबत बाळगणारी… ग्रह-ताऱ्यांना मिरविणारी… आव्हान देणारी… पृथ्वी नावाच्या ग्रहावरील मनुष्यप्राण्यास सदोदित मोहवणारी….
आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी… आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे ‘अवकाश’ हे पुस्तक…
अवकाश’ हे पुस्तक अशा सर्व गोष्टींवर भाष्य करते. अवकाशाच्या अमर्याद ताकदीबाबत आपल्याला माहिती करून देते. भारताला प्राचीन काळापासून खगोलशास्त्रीय परंपरा लाभली आहेच; त्याला विज्ञानाची जोड मिळत गेली आणि आज विज्ञानाधिष्ठीत समाज घडवण्यामध्ये इस्त्रो, नासा आदी अनेक संस्था प्रत्यक्षात काम करत आहेत. अवकाशातील विश्वाबद्दल आपले आकर्षण संस्कृतीइतकेच प्राचीन आहे. पृथ्वीच्या पलीकडे जाऊन अत्याधुनिक मोहिमा भारताने यशस्वी करून दाखवल्या आहेत. पृथ्वीच्या पलीकडे असणारे विश्व समजून घेण्याच्या प्रयत्न सातत्याने केला आहे, करत आहोत आणि करत राहणार आहोत. ‘अवकाश’ या पुस्तकात याचाच वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाकांक्षा, संशोधन आणि भविष्यात अवकाशातील माणसांचे जगणे या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
या पुस्तकात भूषण जोशी, डॉ. बाळ फोंडके, अच्युत गोडबोले/आसावरी निफाडकर, सुरेश नाईक, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. अनिल लचके, प्रा. डॉ. आर. श्रीआनंद, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. संजय ढोले, डॉ. प्रकाश तुपे, प्रमोद काळे, अथर्व पाठक, सुधीर फाकटकर, अनघा शिराळकर, बी. एच. पाटील, सोनल थोरवे, डॉ. व्ही. एन. शिंदे, दिशा सावंत, सुरेंद्र पाटसकर, गोपाळ कुलकर्णी, सारंग खानापूरकर, मानसी शहा, संजय उपाध्ये यांनी सर्वस्पर्शी अवकाशाचा वेध घेतला आहे. भारताच्या अंतराळ संशोधनातील उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकणारे विविध लेख त्यामध्ये एकत्र केलेले आहेत, ज्यामध्ये चांद्रयानपासून विविध मोहिमांचा समावेश आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण नवी दृष्टी, विज्ञान आपल्यासमोर उभे करते.
या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयीचा मांडलेला पट नक्कीच उपयुक्त ठरणारा असेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






