श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # सीनें में जलन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
#सीनें में जलन… ऑंखों में तूफ़ान… #
…. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं सगळ्या भारतीय सिनेसृष्टीला आणि लोकांच्या हृदयाला जिंकून घेऊन एक अनभिषिक्त सम्राटाचं पद अनेक दशकं गाजवतं राहीला….स्वप्नं बघायची… ती पूर्णत्वास नेताना संघर्ष करायचा… आणि ती स्वप्नं सत्यात उतरावयाची याचा वस्तुपाठच त्याने आजवर केलेल्या शेकडो सिनेमातून तरूणाईलाच नव्हे तर तमाम लोकांना दिला… अन्याय घडो कुठेही.. इट का जवाब पत्थरसे देना… आणि आपल्या साध्या सरळ मार्गी दैनंदिन व्यवहारात जर कुणी आडदांडपणा करून त्रास देत असेल व त्यास दादापुता करूनही ऐकत नसेल तर… खेल तुम्हने शुरू किया तो खत्म हम कर देंगे.. ही अन्यायाविरूद्धची , नाहक पिळवणूकी विरुद्धची लढाई एकट्या खांद्यावर कशी लढायची याचं प्रशिक्षण तो देत गेला… यंग अंग्रीमॅन हा त्याने अशा विविध पैलूंच्या भूमिका साकारून मिळवला तो उगाच नाही… त्याचे खदिरांगासारखे आग ओकणारे डोळे जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आता अन्याय कर्ता, जुलूम कर्त्याची आता काही खैर नाही हे हाणामारी आणि दे दणादण मारपिट पटातून आपल्या दिसून येते…पूर्व सुरीचा हिंदी चित्रपटातील रोड रोमियो ची असलेली नायकाची प्रतिमा त्याने आपल्या कलेच्या अदाकरीने बदलून टाकताना… नायकातली नजाकत आणि शांत डोक्याचा मुत्सद्दी खलनायक रंगवताना नकारात्मक नायकाचे गुणधर्म जास्त भावतात…काहीवेळा तर त्याच्या नायकाची प्रतिमा आपल्या रसिक मनावर इतकी बिंबली गेली असल्याने त्याने हा खलनायक रंगवला आहे हेच मुळी पचनी पडत नाही…राग जितका टोकाचा त्याला दाखवता आला तितकेच प्रेमाचे, मोहब्बतेचे, इश्काचे नजारे सुध्दा अगदी संयत दाखवून दिले… तो ज्या चित्रपटात असेल त्या चित्रपटातील नायिका त्याच्यावर फिदा होताना पडद्यावर वर दिसायच्या पण पडद्या बाहेर खाजगी जीवनात देखील त्या नायिका ‘ ‘हाय मैं मर जावाॅं’ करत अपनी जिंदगी न्यौछावर करायला मागे पुढे पाहत नसत… किंबहुना काहींना तर त्याच्या प्रेमाचा सिलसिला असाच अखंड चालू राहावा असचं वाटल्याने त्यां आजही अतुट प्रेमापोटी त्याच्यासाठी ‘ नजर लागी सय्या तोरे बंगले पे’ आळवत मैं तुलसी तेरे ऑंगन की बनून राहिल्या… पण आपल्या मनातील ही होणारी चलबिचल मात्र त्याने चारचौघात कधीही चर्चेवर दिसणार नाही याची काळजी घेतली… अफवा, कंडम गाॅसिप के चर्चे तर हर जुबान पर होत राहीले… असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहीला… उत्तुंग उंचीवर पोहचला आणि या सम हाच असा एकमेवाद्वितीय राहिला…निसर्गाच्या नि नियतीनेही तशात त्याला असे काही फटकारले तेव्हा तर तो काळाच्या पडद्याआड लुप्त होता होता त्याच्या सतीच्या पुण्याईने तारले… कलावंताला घडवता येत नसते तर तो घडत जात असतो ,पैदाईशीच असतो..याला आपल्या अलौकिक कीर्तीच्या अंहकाराने छेद देत कलावंत निर्मितीची प्रशाळा आपले सगळे तनमन नि ओतून उभा केली… पण नियतीला ते साफ ना मंजूर होते आणि त्याला क्षणात होत्याचे नव्हते केले… चलती हुई गाडी दलदलमें फस गई… तोपर्यंत यंग अंग्रीमॅन चा करिष्माही संपलेला होता… बाजारू चलनी नाण्यांचा अभिनेत्यांचा खणखणाट सुरू असल्याने त्याला रोड पतीची अवकळा आली होती… पण इथं नियतीचे दान त्याला अनुकूल असे पडले.. कौन बनेगा.. च्या टि. व्ही. छोट्या पडद्यावर तो आला.. आणि पुन्हा त्याने आपल्या कलेची झलक दाखवून द्यायला सुरुवात केली.. बघता बघता ती कलावती अधिक जोमाने दौडत निघाली… पुनश्च त्याला उत्कर्षाचे दिवस लाभले… आणि मग खऱ्या अर्थाने म्हणू लागला मेरे पास अब पहलेसे ज्यादा सबकुछ है.. बंगला है, गाडी है,ढेर सारा पैसा है, दौलत है, आज पहले जैसे क्या नही मेरे पास…तुमही बताओ…हां एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची राहून गेली…माझा पहिल्या भरभराटीच्या काळातले अवतीभवतीचे माझे माझे म्हणणारे लोक मात्र माझ्या पडत्या काळात सोडून गेले आणि आता मधूचा सुवास येताच माशा पुन्हा घोंगावू लागल्यात… एक गोष्ट माझी मात्र अजूनही तशीच साथ देतेय ती तीस पैश्याची पुत्तूशेठ बीडी कालही होती तशीच आजही माझ्या ओठांवर शिलागावून बसलेली आहे… ना तिची चव बदलली ना तिला माझ्या श्रीमंतीने लाथाडले… म्हणूनच मी तिला जवळ ठेवले आहे… तिच्या मदतीनेच मी माझ्या नैराश्याचा धूर बाहेर सोडत असतो… आणि बीडीचे जळणारे लालचुटूक थोटूकाची ठिणगी मला जगण्याची सतत उर्मी देतं असतं…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







