डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे… भाग – १ ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
विवाहितांसाठी सुखी जीवनाची पाच सूत्रे – –
विवाहित महिलांसाठी
१) कधीच कुणाशी बरोबरी करू नका
ना इतरांकडे असलेल्या वस्तूंची, ना इतरांच्या नवर्याची, ना इतरांच्या कोणत्याच गोष्टीची आपल्या जीवनाशी बरोबरी करू नका!! त्यातून निष्पन्न फार काही होत नाही उलट त्या ओझ्याने आपलाच माणूस दबून जातो आणि चिडचिड वाढते!! प्रत्येकाचे जीवन हे वेगळेच असते, त्यामुळे जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार करून त्यात आनंद माना.
२) स्वतःसह घरही सुंदर ठेवा
प्रत्येकीला जसे आपण छान दिसावे असे वाटते, त्यासाठी ती प्रयत्नही करते. तसेच आपले घर देखील कायम सुंदर राहील याची काळजी घ्या!! कारण पुरुषांना (जरी ते घरकामात मदत करत नसेल तरी) घर हे सुंदरच असावे असे वाटते. त्यामुळे घरातील पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे! याकामी आपल्या मुलांची मदत घेता येते आणि त्यातून नकळत मुलावर संस्कारही होतात. घरात पसारा दिसल्यावर पुरुषाच्या कपाळावर आठ्या का पडतात? याचा विचार करा
३) पुरुषांवर लक्ष ठेवा पण प्रेमाने!!
पुरुषाचे बाहेरचे वेळापत्रक प्रेमाने जाणून घ्या!! तो आपल्यासाठीच धावपळ करतोय, हे लक्षात घ्या!! आणि मग त्याच्या हातून एखादे जरी (छोटेसे) काम चांगले झाले तर त्याचे ‘योग्य” त्या प्रकारे कौतुक करा!! त्यामुळे त्याला हुरूप येतो आणि अजून चांगल्या गोष्टी तो करू लागतो!! कौतुक कोणाला नको असते हो?? सर्वांनाच हवे असते!! मग त्यात कंजुषी का करायची?
महत्वाचे म्हणजे त्याच्या पाठीमागे त्याचे खिसे तपासत बसू नका. उलट त्याच्या समोर तपासा…. हे त्याला सुद्धा कदाचित आवडेल आणि दोघांमधील विश्वासाचा पाया अजून मजबूत होईल. अशावेळी कदाचित तुम्हाला न आवडणारं काहीतरी त्याच्या खिशात सापडेल त्याबद्दल लगेच त्याला धारेवर धरण्याऐवजी त्याला ती गोष्ट का घ्यावीशी वाटली हे त्याच्याकडून समजून घ्या. उदा. गाय छाप पुडी सापडली तर “तंबाकू किती घातक” यावर लेक्चर देण्यापेक्षा त्याला ती का खावी वाटत्ये हे समजून घ्या आणि मग त्याला त्या ऐवजी दुसरे चांगले पर्याय पण असतात हे दाखवून द्या.
व्यसनमुक्तीच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एक सीन पाहिलेला…. ज्यात बायको त्याच्या नवऱ्याजवळ मिठीत उभी राहून किस घेताना आधी हळूच म्हणते, “ये होटोका जाम हररोज मिलेगा अगर तुम ग्लास का जाम दूर रखो तो”
तर आशय समजून घ्या! लहानपणी आपल्याला आई कशी म्हणायची, “अभ्यास कर, चांगले मार्क पडले तर तुला आवडीचे घड्याळ घेऊन देईन”
बास…. तोच फॉर्मुला नवऱ्याबद्दल वापरून पहा! फायद्यात जाल.
४) पुरुषाच्या गरजा फार कमी असतात. हे लक्षात घ्या
त्याला रोज उठून तुम्ही लाड करावेत, मसाज करावा, अंघोळ घालावी, गोड धोड खाऊ घालावे, कायम सजून राहावे अशी अपेक्षा मुळीच नसते!! पण कधीतरी मुद्दाम सवड काढून या गोष्टी करा!! दिवाळी दसर्याला त्याची आरती करून अभ्यंग स्नान घालण्या पेक्षा एखाद्या रविवारी देखील “दसरा” करता येतो!! त्यातून मग नवरा देखील हसरा होतो!!
५) चांगल्याचा आग्रह धरा
चुकून कधीतरी नोकरीत टेबला खालून चे व्यवहार होऊ शकण्याची जर नवर्याची खुर्ची असेल तर त्या घरातील महिलांनी खूप सावध राहावे!! आपण साधे राहू, चटणी भाकरी खाऊ पण “असल्या” पैशातून येणारे सुख नको, हे त्याला ठणकावून सांगा!! आरोप करत नाही पण खरे सांगतो, महिला जर या बाबतीत “जागृत” राहिल्या तर देशातील निम्मा भ्रष्टाचार कमी होईल!! कारण सर्व जगाला तो उल्लू बनवू शकतो किवा धाकात ठेवू शकतो पण घरी बायकोसमोर तो झुकतोच!! त्याचा फायदा घेवून त्याला सन्मार्गावर चालण्या साठी सतत प्रोत्साहन द्या!!
वेळ काढून इतकं सगळं वाचल्याबद्दल तुमचे आभार!
– भाग पहिला
© डॉ. धनंजय देशपांडे
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
https://www. facebook. com/ddtilakroad
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





