प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

☆ माझ्या स्वप्नांच्या काही ओळी…  ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

एकदा काय झालं? – – 

अशोकचक्र माझ्या स्वप्नात आलं, आणि थोड्याच वेळात दिसेनासं झालं.. त्याच्या अंधूक होत गेलेल्या.. आकाशासारख्या आणि समुद्रासारख्या निळाईकडं पहात मी म्हणालो,

” अशोकचक्रा, कुठं तू गेलास ? काही न बोलता गायब झालास “.

सिंहांची डरकाळी ऐकून मी घाबरलो, ‘ कुठं शस्त्र मिळतं का? ‘ हे शोधू लागलो.

तोच दुसरा आवाज आला, पण- तो मंद स्वरातला,

” भिऊ नकोस, मित्रा, मी दिसत नाही म्हणून.. मी असतो त्या स्तंभावर, मी वसतो त्या स्तंभावर..

तिथल्या तीन सिंहांचा तो आवाज आहे “.

परत माझी गाळण उडाली, हातापायातली शक्ति गेली; पुन्हा तो आश्वासक ध्वनि आला,

“ भिऊ नकोस “ म्हणाला. ” ह्या सिंहांमध्ये जरी असेल सामर्थ्य आणि शक्ति, आळवतात ते सदा माणसांचीच भक्ति; आणू नकोस मनात भिती, सिध्दांत त्यांचा असतो शांती; नकोस म्हणू की, मी दिसत नाही, मी आहे सर्वत्र.. का तू बघत नाही ? 

.. हमाल श्रमतो, तिथं मी आहे,

.. मजूर घाम गाळतो ना- तिथं मी आहे; 

.. शेतकऱ्यांच्या गळ्यात मी आहे, ते जिथं राबतात- त्या शेतमळ्यांत मी आहे; 

.. हुंडयासाठी लग्नाच्या होमकुंडात होरपळणाऱ्या ताईमध्ये मी आहे,

.. अश्रूंमध्ये भाकर भिजवून लेकरांना भरवणाऱ्या आईमध्ये मी आहे; 

.. एटीएममधून येणाऱ्या नोटांमध्ये मी आहे,

.. मतदानातून प्रकटणा-या नोटांमध्ये मी आहे; 

.. सोन्याच्या खाणीत मी आहे,

.. दुर्बलांच्या वाणीत मी आहे;

.. खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये मी आहे,

.. पेटीवर झंकारणाऱ्या बोटांमध्ये मी आहे,

.. मंदिरांमधल्या जोडलेल्या हातांमध्ये मी आहे,

.. मशिदीत जाणाऱ्या पायांमध्ये मी आहे;

.. क्रिकेटच्या मैदानात भारतासाठी झुंजणाऱ्या वीरांच्या मस्तकावर मी आहे,

.. युद्धभूमीत विजयी शूरांनी रोवलेल्या डोंगरशिखरावर मी आहे; सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये मी आहे;

.. या देशासाठी लढलेल्या- स्वातंत्र्यसैनिकांमध्ये मी आहे,

.. चंद्रावर दिमाखात उतरलेल्या यानावर मी आहे;

.. अविद्येविरूध्द लढणाऱ्या तलवारीच्या म्यानावर मी आहे;

.. इथल्या मनामनांत मी आहे;

.. इथल्या कणाकणांत मी आहे;

भेटलास आज तू तर एक विनंती करतो,

” लोकशाहीची आठवण ठेवा, संविधानाने दिलाय तुम्हाला अमोल ठेवा; याच संविधानानं सिंहांना शांतीदूत केलंय, आणि-

.. गलितगात्र मेंढरांना सिंह केलं;

हक्कांचा आग्रह जरूर धरा, पण कर्तव्याचीही कास धरा. तेव्हा कुठं संविधानाच्या स्वप्नांना सत्याचे पंख मिळतील, आणि..

.. आणि लोकशाही चक्राचे सगळे आरे वेगाने फिरतील “.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- sks.satish@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted