श्री मंगेश मधुकर
☆ नवं स्वातंत्र्य… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
गेले काही दिवस टू बी ऑर नॉट टू बी अशीच अवस्था होती. एक विचार मनात घोळत होता अन त्याबाबत निर्णय होत नव्हता. आपली गरज अन त्यासाठी घालवत असलेला वेळ यांचं गणित मांडलं तेव्हा जमेपेक्षा वजाबाकीच जास्त भरली. व्यावहारिकदृष्ट्या कायमस्वरुपी असा निर्णय घेणं शक्य नव्हतं म्हणून तात्पुरच्या काळासाठी स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून १५ ऑगस्टला निर्णय घेतला अन………
“अरे, काय झालं रे”
“काही प्रॉब्लेम”
“एकदम अचानक”
“बरायेस ना”
“कसं शक्ययं”
“फार प्रॉब्लेम होतील”
“जगणार कसा?”
“बाबो, एकदम डेंजर निर्णय”
“टेपररी ईमोशन्समध्ये काहीही करतोस का?”
“प्रॅन्क चांगलाय”
“बघ बाबा विचार कर”
“वाटतं तितकं सोपं नाहीये”
“आयला, भारी निर्णय”
“लकी मॅन, मला पण ईच्छा आहे पण शक्य नाही. ”
“हे काय नवीन खुळं”
“वा!!”
“उत्तम”
“मूर्खपणा”
“फक्त काही दिवस नंतर येरे माज्या मागल्या”
“काहीही!!”
“आजच्या काळात शक्यच नाही”
“वेडा होशील”
“जगणार कसा”
“हे काय नवीन फॅड”
“आवडलं आपल्याला”
“असं करू शकतोस. ”
“एकदम फाडू डिसीजन”
“लेका नशीबवान आहेस. ”
“जगापासून वेगळा पडशील”
“ही थेरं जास्त दिवस चालणार नाहीत”
“अय्या, खरंच. कित्ती भारी!!”
“मी पण करणार”
“काहीही गरज नव्हती. उगीच आपलं…. ”
“सेल्फ कंट्रोल हवा”
“जगा सोबत रहा, नको तो वेडेपणा करू नकोस. ”
“वेगळा निर्णय”
“काहीतरी डिफरंट”
“अंमलबजावणी साठी शुभेच्छा ”
“आ!! हे का? कशासाठी?
“डोक्यावर पडला का?”
“डिफीकलट टू इंपलीमेंट ”
“बेस्ट विशेस”
“ऑल द वेरी बेस्ट”
“बघू किती दिवस हा खेळ चालतोय ते”
“खरंच ब्रेकिंग न्यूज”
— —
माझा निर्णय समजल्यावर नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून वरीलप्रमाणे प्रतिक्रिया आल्या.
अनेकांनी थेट फोन केला तर काहीनी sms केले. डॉक्टर मित्र दोनदा घरी येऊन बीपी चेक करून गेला. सगळं नॉर्मल होतं. या निर्णयावर प्रतिक्रिया येणार याची कल्पना होती पण इतक्या मोठ्या प्रमाणावर येतील असं वाटलं नव्हतं.
…. खरंतर अगदी छोटा, साधा अन खाजगी निर्णय होता. फार काही ग्रेट, क्रांतीकारक वगैरे तर अजिबात नाही…….
…… स्वतःसाठी वेळ आणि मनशांतीसाठी मी मृगजळापासून फारकत घ्यायचं ठरवलं.
रोजच्या जगण्यातला अस्वस्थपणा कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणा हवं तर.
म्हणून मी ठरवून, फोनमधून फेसबुक, व्हॉटसप, ईनस्टा सगळं डिलिट केलं.
सोशल मीडियावरुन व्हीआरएस घेतली.
फोन आणि मन दोन्हीही शांत झालं.
सुरुवातीला थोडं बेचैन वाटलं पण हळूहळू सवय होतेय….. शरीरासाठी जसा करतो तसाच
मनस्वास्थ्यासाठी केलेला डिजिटल उपास….
तुम्हीही प्रयत्न करून बघा…
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





