सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ अबुधाबी येथील हिंदू मंदिर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
या वेळी दुबईला येताना मनात अबुधाबीचे मंदिर बघायचे असा विचार होताच.. माझी मुलगी प्राची आणि जावई मंदार ह्यांनी पहिल्या च सुटीच्या दिवशी अबुधाबी मंदिर बघायला जायचे ठरवले आणि मला मनापासून आनंद झाला…
ठरल्याप्रमाणे २६-७-२०२५, शनिवारी, दुपारी ४-३० वाजता अबुधाबी येथील मंदिर बघायला
जाण्यासाठी निघालो. तिथे पोचायला १/१-१५ तास लागला. मंदिर खूप लांबून ही दिसत असते. एअरपोर्ट सारखी सिक्युरिटी असल्यामुळे प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जायला १५/२० मिनिटे लागली. पाण्याची बाटली सुध्दा बरोबर नेता येत नाही, पण जागोजागी आत पाणी बाॅटल मिळते. मंदिर अप्रतिम बांधले आहे. मोदीजीनी या मंदिराला भेट दिली तेव्हाचा मोठा फोटो तिथे आहे.
मंदिर बांधायला जवळपास चार वर्षे लागली. आपल्या कडील बिर्ला मंदिराप्रमाणे मंदिरातील मूर्ती भव्य आणि देखण्या आहेत. शंकर-पार्वती, जगन्नाथ पुरीचा जगन्नाथ, राधा -कृष्ण, श्रीनिवास आणि पद्मावती, अय्याप्पा, स्वामी नारायण यासारख्या संतांच्या मूर्ती, राम- लक्ष्मण-सीता अशी वेगवेगळी मंदिरे एकाच दालनात आहेत. तेथील सर्व खांबांवर कोरीवकाम सुंदर केले आहे. त्यातून राम, कृष्ण यांच्या जीवनावरील चित्रे तयार केली आहेत.
अतिशय स्वच्छ, प्रसन्न वातावरण आहे. ७ वाजता गंगा आरती असते. मंदिराभोवती गंगा म्हणून पाण्याचा वाहता प्रवाह आहे. दिवे सोडतात. आपल्याकडे दिवाळीत छोटे सेलवर चालणारे दिवे मिळतात तसे दिवे विक्रीसाठी असतात, तसेच पाण्यावर तरंगणारी कृत्रिम कमळे ही असतात. आम्ही ती विकत घेतली. आणि गंगा आरतीच्या वेळी मंदिराभोवतीच्या पाण्यात सोडली. सर्व भारतीय श्रध्देने हे सर्व करतात. वातावरण प्रसन्न, हिंदू संस्कृतीचे असते.
त्यानंतर फोटो काढले आणि खाली उतरलो. तिथे फुड कोर्ट आहे. कालचे रात्रीचे जेवण आम्ही तिथेच घेतले. डाळ-तांदळाची खिचडी आणि दही.. बाकी बरेच खाण्याचे पदार्थ होते. त्यानंतर मुलांनी आईस्क्रीम आणि मी काॅफी घेतली. कोकम सरबत प्राचीने घेतले.. एवढे सर्व होईपर्यंत ९ वाजत आले होते. पुन्हा परतीचा तास दीड तासाचा प्रवास करून रात्री १०/१०-१५ वाजता घरी आलो.
… एक खूप छान नवीन देवस्थान बघायला मिळाले, तेही दुबईत! दिवस सार्थकी लागला.. थोडी दमणूक झाली, तसं बरंच चालावे लागते, पण आज विश्रांती!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






