श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “स्पेशल मित्र…” ☆ श्री मंगेश मधुकर

दिवस-रात्र, ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असलं तरीही कायम सोबत असणारा स्पेशल मित्र.

आज खास त्याच्यासाठी काही – – –.

तसं पहायला गेलं तर मैत्री अनेकांशी असते. कोणी नावापुरतं तर कोणी जिवलग. कोणी नकोसं तर कोणी हवंहवंस. काही स्पेशल तर काही ऑप्शनल – –

….. परंतु ‘तो’ मात्र व्हेरी व्हेरी स्पेशल. एकदम खासमखास.. श्वासासारखा कायम सोबत.

कळायला लागलं, विचार करायला लागलो तेव्हापासून बरोबर.

.. अजून साथ सुटली नाही अन कधी सुटणारही नाही. त्याला वेगळं करूच शकत नाही.

दुधात विरघळलेली साखर बाजूला करता येत नाही. तसंच काहीसं.

… आनंदात ‘तो’ असतो. दु:खात त्याचाच आधार, संकटाच्या वेळी धीर देणाराही तोच. एकटं तर कधीच सोडत नाही. खाजगी, सार्वजनिक, सामाजिक सर्वच विषयांवर त्याच्याशी संवाद चालूच. त्याच्याशी बिनधास्त बोलता येतं. व्यक्त होता येतं. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती असते… अगदी टॉप सिक्रेटही.

… त्याच्याइतकं विश्वासू दुसरं कोणी नाही. त्याच्याबरोबर खोटं बोलता येत नाही.. लपवाछपवी करता येत नाही. प्रत्येकवेळी त्याचं मत घेतलं जातं.

कधी ‘तो’ पटकन निर्णय देतो … तर कधी पर्याय देऊन गोंधळात टाकतो.. कधी बरोबर असतो तर कधी चुकतोसुद्धा.

प्रत्येकाचा असा ‘स्पेशल मित्र’ असतो … हा मित्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही … तर आपलं “मन”

कुठं असतं ते माहिती नाही पण ते असतं हे नक्की. अनेकदा त्याचा उल्लेख होत असतो.

…. खरंतर मन म्हणजे आपली लाइफलाइन. त्याच्याइतकं कोणाशीच प्रामाणिक नसतो त्याला आपण जपतो का? .. तर नाही… त्याला गृहीत धरतो किवा दुर्लक्ष करतो.

.. तरीही ते आपली काळजी घेणं थांबत नाही. आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात.. त्याचा त्रास होतो तेव्हा तेच समजावतं. त्याच्याइतकी आपल्या भल्या-बुऱ्याची काळजी कोणालाच नसते. व्यसनं, वाईट, चुकीच्या गोष्टी याविषयीची जाणीव करत राहतं. आणि तब्येतीची काळजी घेण्यासाठी आग्रह करतं. वेळोवेळी सूचना करतं परंतु आपण कारणं देत सोयीस्कर वागतो. त्रास झाल्यावर पश्चाताप आणि अपराधी वाटतं पण ते तात्पुरतं… आपण काही सुधारत नाही. तब्येतीची हेळसांड करत राहतो 

थोडक्यात, पुन्हा येरे माझ्या मागल्या..

.. तरीही हा आपला “ मित्र” प्रयत्न सोडत नाही.

म्हणूनच,

… इतरांना जपता तसंच याला सुद्धा जपा.

…. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा

…. यात फायदा तुमचाच

आणि.. त्रासही कमी.

! ‘चॉइस इज युवर्स’!

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted