डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ मी पाहिलेली झाशीची राणी…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
मिरचीवाली झाशीची राणी….. हे टायटल वाचून दचकू नका, खरोखर झाशीच्या राणी इतकीच पराक्रमी बाई मी स्वतः पाहिली आहे. पूर्ण एक दिवस त्यांच्या सहवासात घालवला आहे. सोबत त्यांच्या घरी चटणी भाकरी खाल्ली आहे. आणि त्यांनी जिंकलेली जीवनाची लढाई नंतर शब्दात मांडून माझ्या “कर्तुत्वाला सलाम” या पुस्तकात सादर केली आहे. त्यांचीच हि थरारक कहाणी! मुळात माझे ते पुस्तक (कर्तुत्वाला सलाम) हे लिहिण्यामागे हाच उद्देश होता कि, मान्य आहे, अनेक पराक्रमी महिला इतिहासात होऊन गेल्या. त्यांचा आदर्श नक्कीच आहे. पण मग आजच्या काळात तशा सापडणार नाहीत का? हा विचार मनात आला, आणि मग एका पाठोपाठ एक अशा तेजस्वी महिला भेटत गेल्या! एकट्या पुणे परिसरातच मला त्यावेळी ४ महिन्यात ३० महिला भेटल्या!
पुण्यातील फुले मंडईत आजही पाठीमागच्या शेवटच्या लाइनीतील गाळ्यावर कधी गेलात तर तिथे हिरव्या मिरच्या विकणार्या (आता जराशा थकलेल्या) बाई दिसतील.
त्याच या बायडाबाई पंडित. आयुष्यभर त्यांनी फक्त आणि फक्त मिरच्याच विकल्या. मंडईत एका बाईमाणसाने तसल्या वातावरणात जीवनाची 30 वर्षे काढली.
तुम्ही म्हणाल यात काय नवल?? तर पुढे ऐका…!!
मुळात तो परिसर तसा अनेक अर्थानी गाजलेला. भांडण / मारामाऱ्या रोजच्या ठरलेल्या. त्यात गर्दीचा “नको” तो फायदा घेणारे मवाली देखील. मात्र या सगळ्यात खंबीरपणे राहून आपला संपूर्ण परिवार या बाईंनी नुसता जगवला असे नाही तर अतिशय सुशिक्षित आणि उच्च पदस्थ करून दाखवला. स्वतः शाळेची पायरी देखील ज्या बाईने कधी चढली नव्हती, आज तिची नातवंडे कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहेत.
त्या कष्टातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षीत केले. आणि आता त्यांचा एक मुलगा टाटा कंपनीत अतिशय मोठ्या पदावर अधिकारी आहे. दुसरा मुलगा फॅशन डिझाइनर असून त्याचे स्वत:चे मुख्य बाजारपेठेत स्वत:चे लेडीज गार्मेंटचे दुकान आहे. एकेकाळी घरची गरिबी म्हणून बायडाबाईंनी ते काम केले. पण आता सर्व सुखे हात जोडून समोर उभी आहेत, तरी आजही त्या मिरचीच्या गाळ्यावर बसतात. कष्ट आजही करतात.
वरुन मला म्हणतात, ‘वापरात नसली तर वस्तू पण गंजते. आपण तर हाडामासाची माणसे आहोत. गंज नाही का चढणार? म्हणून हातपाय हालतात तोवर काम करीत रहावे… “
गप्पा मारताना शेवटी मी विचारले होते कि, “आजच्या तरुण मुलांना / मुलींना काय सांगाल? “
तर त्या म्हणाल्या, “आई बापाला विसरू नका, हे मुलांना सांगेन आणि सासू सासऱ्याला स्वतःच्या आई वडीलसारखं जपा, हे मुलींना सांगेल. तरीपण हल्ली मुलांनी देखील घरात मदत करावी. दोघेही कामावर जातात मग दोघेपण थकलेले असणार हे मुलांनी ओळखावे. स्वतः टीव्ही पाहत बसणार आणि बायकोनी परत सैपाक पण करायचा, हे घडू नये. शेवटी हात जोडले तर मानस प्रेमाने जवळ येतात, तेच हात दगड घेऊन उभे राहिले तर मानस दूर जाणार! हे कळले तरी खूप झाले!
***
डॉ डीडी क्लास : नकळत दीर्घायुष्याची आणि निरोगी जगण्याची गुरुकिल्लीच त्यांनी माझ्या हाती दिली. सलाम बायडाबाई, त्रिवार सलाम तुम्हाला फारसे काही हाती नसताना या बाईंनी जर जगण्याची लढाई जिंकली तर आपण जरा स्वतःकडे पाहूया. आज आपल्याला सुदैवाने बरेच काही आहे. पण तरी नकारात्मक भावना का वाढतेय? हा विचार पुसून टाकण्यासाठी हि पोस्ट..
—
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




