सुश्री तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ वर्ष आणि वय… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
हे दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने सारखेच भासले तरीही त्यांच्यामध्ये फरक आहे. वर्षात व्यावहारिकता आहे, करारमदार याचा संबंध आहे, त्रयस्थपणा, तटस्थपणा आहे. तर वयात भावनिकता, आठवणी आणि अनुभव आहे.
वर्षभराच्या नोंदी या शक्यतो जास्त करून व्यवहारिकदृष्ट्या वापरल्या जातात किंवा अगदी मोठ्या प्रमाणात सामूहिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवरुन काम करायचं असेल तर त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींची नोंद ही वर्षाच्या दृष्टिकोनातून केली जाते. पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात वय जास्त महत्त्वाचं असतं. वयागणिक माणसाच्या शरीरात, मनात, विचारांत बदल होत असतो. आणि हा बदल आपल्या जगण्याला निरनिराळी दृष्टी देत असतो. गंमत म्हणजे आपल्या जन्मापूर्वीच्या सगळ्या घटनांना आपण सहजपणे वर्ष या कॅटेगरीत बसवून बघू शकतो. पण आपल्या जन्मानंतर घडलेल्या घटनांना मात्र आपण आपल्या वयाच्या संदर्भानुसार आणि जाणिवेनुसार बघतो.
एखाद्या देशाच्या, संस्थेच्या नोंदीमध्ये वर्षाला स्थान असणं महत्त्वाचं आहे. कारण एकूण परिस्थिती आणि त्याचा होणारा सामुहिक परिणाम या दृष्टिकोनातून व्यक्तिपेक्षा सामूहिक गणना ही तिथे महत्त्वाची ठरेल. पण आपल्या व्यक्तीगत जीवनामध्ये मात्र वर्षापेक्षा वयाच्या आठवणी खूप विशेष ठरतात.
अगदी बोलतानासुद्धा आपल्याला त्या वयाच्या संदर्भात आठवतात. साल कुठलेही असलं तरी आपल्याला आपलं वय, आपला अनुभव आपल्याबरोबर त्यावेळेला असणारी इतरांची वयंच लक्षात राहतात.
माझ्या आयुष्यात माझं शिक्षण, नोकरी, लग्न या गोष्टी माझ्या वयाच्या ज्या टप्प्यावर घडल्या तर टप्प्यातून त्या वर्षांकडे मी बघते. त्या घटनांकडे मी बघते. केवळ अमुक एक साली लग्न झालं म्हणून त्या घटनेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ठरत नाही.
– – म्हणजे वय आणि वर्ष दिसताना सारखेच दिसत असले आणि काही प्रमाणात सारखेच वाटत असले तरीसुद्धा किती भिन्न पातळीचा अनुभव देतात नाही का? असो.
आता येणाऱ्या वर्षाच्या स्वागताचा विचार करताना हे असंच मंथन झालं.
… तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! येणार नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येणारं ठरो.
… आणि येणाऱ्या प्रत्येक वाढत्या वयागणिक आणि वर्षागणिक आपला स्नेह कायम राहो.
© तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





