श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय लुई… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(४ जानेवारी – लुई ब्रेल यांची जयंती.. त्यानिमित्ताने ही कविता त्यांना समर्पित)

प्रिय लुई,

तू स्पर्शाने लिहिलंस उजेडाचं स्वप्न

बोटांच्या टोकावर उगवली अक्षरं

आणि मौनातून जन्माला आली

एका उजेडाची भाषा…

 

जिथे शब्द थांबले

तिथून पुढे स्पर्श बोलू लागला

ज्यांनी उगवलेला सूर्य कधी 

पाहिला नाही

त्यांच्या डोळ्यात तू उजेडाची पणती पेटवलीस…

 

लुई 

तू फक्त संशोधक नाहीस

तू आहेस आशेचा स्पर्श

अंधारात हरवलेल्या लाखो लोकांचा हर्ष

निसर्ग न पाहिलेल्या लोकांनी

निसर्ग कागदावर मांडला

समुद्र न पाहिलेल्या लोकांनी

समुद्र कागदावर सांडला

तुझ्यामुळे बंद पापण्यांना मिळाली दृष्टी

आंधळ्यांच्या जगात जन्माला आली

एक सुंदर डोळस दृष्टी…

 

तुझ्या डोळ्याला झालेली जखम

त्या जखमेतून झालेली वेदना

आणि त्या वेदनेतून निर्माण केलेलं

हे स्पर्शांच्या अक्षरांचं जग 

तुझे उपकार कधीही विसरणार नाही…

 

त्या स्पर्शाची अक्षरे मला गिरवता आली नाहीत कधीच

पण,

माझ्या दृष्टी असलेल्या डोळ्यांनी 

मी लाखवेळा तू निर्माण केलेली बाराखडी

माझ्या मनावर ब्रेल लिपी गिरवत राहिली आहे

म्हणूनच मला

माणूसपण आणि तुझ्या स्पर्शाच्या भाषेने 

डोळस शहाणपण आलेलं आहे…

त्याबद्दल मी आयुष्यभर तुझा आभारी आहे…

 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments