प्रा.भारती जोगी
मनमंजुषेतून
☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆
तर… प्रेमाची मितीच बदलली असती.
प्रेमातील दिवसांचे रूपच वेगळं असतं.
तू… तळमळत काढली असतीस आख्खी रात्र, आणि मी… गाढ झोपले असते.
तू… रात्रभर अश्रू गाळत बसला असतास, आणि मी आनंदात, हसत!
तेव्हा तू पत्र लिहिलं असतस, आणि मी… मी ते असच कुठेतरी पडू दिल असतं… विसरून ही गेले असते.
तू… एकटा, एकाकी उभा… खिडकीतून बाहेर बघत… आणि मी..
मी… रात्र रात्र मित्रांच्या मैफिलींमध्ये रंगून जात, त्यांना मोहवत, त्यांची भुलावण करत राहिले असते.
चूक माझी असतांनाही, तू माफी मागितली असतीस.
तेव्हा मी… आणखीनच ताठ होत, ऐट दाखवली असती.
*जर मी… तू असते, आणि तू मी असतास… तर.. *.
तू आनंद, दु:ख, लज्जा… सगळी गुपिते कानी घातली असतीस माझ्या
आणि मी… मी ती उडवून लावली असती हवेत… निष्ठुर, भावनाहीन, बेपर्वा होऊन.
जेव्हा एकटेपणा असह्य होऊन तू कोसळला असतास पायावर माझ्या
मी… मोठ्या ताठ्याने तूला शहाणपण शिकवलं असतं.
तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कारण पुढे करत… रोज तुझ्या पासून, थोडी थोडी दूर होत गेले असते मी.
जर तू स्वाभिमानाची लाज राखण्यासाठी म्हणून माझ्याशी बोलला असतास ; तर…
मी… मौन धारण करून सुटका करून घेतली असती माझी.
*जर मी तू असते, आणि तू मी असतास*
*तर… मितीच बदलली असती प्रेमाची*
जेव्हा तू नाईलाजाने माझी प्रत्येक गोष्ट मानून तडजोड केली असतीस
तेव्हा मी माझा हक्क समजून जीवनात आणखीनच मौज-मजा केली असती.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तूला माझी उणीव भासली असती.
पण मला तुझी प्रतिमा, माझ्या परिघात खूपच छोटी वाटली असती.
तू काही सांगत असतास तर मला ते ऐकूच आलं नसत.
तू वारंवार आला असतास, पण मी बोलावलं नसत तूला.
तू हात पुढे केला असतास… मी माझा हात मागे घेतला असता.
तूला हसावसं वाटलं असतं… मी पुन्हा पुन्हा रडवलं असत.
पण… हे सगळं कसं बरं झालं असत?
हे तर केवळ अशक्य ना??
भाग्यरेखा कशी बरं पुसता येईल?
तू तर तूच रहाणार आहेस, आणि मी मीच…
प्रेमाच्या तारखा, आणि मिती ही तशाच रहाणार…
युगानुयुगांची परंपरा ही… कोण बदलणार??
गा-हाणी… व्यथा… घुसमटलेल्या मनांच्या… कोण ऐकणार???
(नादिरा बब्बर यांच्या और तुम होते मैं या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद!)
अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





