श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ आपण नामाचे सावकार…!! ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
प्रिय महाराज,
शिरसाष्टांग नमस्कार.
आताच घरी सुखरूप पोचलो…!!
लेकीने चार दिवस माहेरी यावं आणि त्यातील एकेक दिवस चार दिवसांचा असावा, असे कुटुंबवत्सल असलेल्या प्रत्येक बापास वाटतं असेल…
लेक माहेरून सासरी निघाली की तो पोचल्याचा फोन येईपर्यंत आईबापाच्या जीवाची घालमेल होत असते… हो ना…?
आणि म्हणून आताच घरी पोचलो आणि तुम्हाला पत्र लिहायला घेतलं आहे…
– – खरं सांगू का? पत्रात काय लिहू? असा प्रश्न मला पडला आहे…
घरून निघताना आपल्याकडे मागण्याची मोठी यादी असते, गोंदवल्यात जाईपर्यंत ती पाठ झालेली असते,
पण…
जेव्हा तुमची दर्याद्र दृष्टी आमच्यावर पडते ना… तेव्हा आमचं मन विरघळून जातं…
मनाची संपूर्ण जागा तुम्ही व्यापून घेता आणि आमचे सर्व विषय, मागण्या त्यात आपोआप विरघळल्या जातात…
तुमच्याकडे कसली जादू आहे, हे काही मला अजून उमगलेले नाही…
पण खरं सांगू गोंदवल्यातून घरी येताना मन भरून जाते आणि पाय मात्र अजिबात निघू देत नाहीत…
पायांना आपल्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीची उब सोडून घरी यावं असे वाटत नसावे…
पण महाराज, आम्ही प्रापंचिक माणसं, आमची दुःख तुम्हालाच ठाऊक…
आजपर्यंत अनेक सावकारांच्या कथा ऐकल्या आहेत. त्यातील काही सावकार दयाळू तर काही सावकार एकदम बदमाश.
पण आपली सावकारी एकदम जगावेगळी…!!!
“आपण नामाचे सावकार…!!”
ज्याला रामाची ओढ नाही, त्याच्या मनात शिरून त्याला गोंदवल्याच्या रामाचे दर्शन घेण्यास प्रवृत्त करणारे…
ज्याने रामाचे दर्शन घेतले आहे, त्याला रामनामाची गोडी लावणारे…
ज्याला रामनामाची थोडीफार गोडी लागली आहे, त्याला अनुग्रह देऊन कृपांकित करणारे..
ज्याला आपण अनुग्रह दिला आहे की जो नाम घेतो, त्याच्या प्रपंचाची आणि परमार्थाची संपूर्ण जबाबदारी घेणारे…
तुमच्यावर विश्वास ठेवून नाम घेणाऱ्याच्या प्रपंचातील आसक्ती नकळत शोषून घेणारे…
प्रत्येक नाम घेणाऱ्याने परमपूजनीय ब्रम्हानंद बुवांसारखे कामासाठी नाम न घेता नामासाठीच नाम घ्यावे असा प्रयत्न करणारे…
अतिशय दर्याद्र दृष्टीने प्रत्येकाकडे पाहणारे…
– – माझी लेखणी… थिटी पडते लिहिताना…
पण आपले कौतुक आणि लीला सांगताना मन मात्र सारखे उचंबळून येत आहे…
कालच्या उत्सवात नामाच्या शक्तीची अगदी छोटीशी झलक माझ्या मर्यादित कुवतेने अनुभवू शकलो…
एकच करू शकतो…
त्रिवार वंदन!!!!
प्रत्येकाने नामस्मरण करून आपल्या जीवाचे कल्याण करून घ्यावे असा आपला उद्देश मला तत्वतः तरी कळला आहे…
इथून पुढे तसे आचरण करण्याचा माझा प्रयत्न असेल…
आपण मला त्यात यश द्यावे…
काल आपल्या पुण्यतिथीला आपले सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ भक्त आलेले असतील, त्याचा कळतनकळत सहवास आपल्यामुळे आम्हाला घडला…
*”तुझ्या भक्ताची संगती मज घडो सर्वदा!! “* असा आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा…
बाकी क्षेम…
तुमचा,
बाळ
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर





