वर्षा बालगोपाल
☆ “पुस्तक म्हणजे काय गं आई?” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
पुस्तक म्हणजे काय गं आई?
अरे पुस्तक हे गुरू असतात
म्हणजे माझे टिचर का गं आई?
नाही रे पुस्तक हेच टिचर असतात. पण हे टिचर कोणीतरी अनुभवातून लिहून ठेवलेले ज्ञान देत असतात. ज्ञान देणारे लिखीत टिचर म्हणजे पुस्तक!!
म्हणजे आपले NEWS PAPER का गं आई?
अरे अरे तसे नाही. NEWS PAPER आजूबाजूला जे घडलेले असते ते सांगत असते. पण पुस्तक म्हणजे तुम्ही शाळा शिकताना तुमच्या वेगवेगळ्या विषयाची माहिती एकत्रीत असते त्यातून बघून टिचर तुम्हाला शिकवतात ना ते म्हणजे पुस्तक!!!
म्हणजे टिचरचा लॅपटॉप का गं आई?
अरे बाबा ते पण नाही!! कसे सांगू तुला? अरे पुस्तक म्हणजे अशी गोष्ट आहे जी बघून तुम्ही शिकत असता केव्हाही कशीही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्या त्या विषयीची लिहिलेली माहिती तुम्हाला देत असते.
म्हणजे टिचरचा स्मार्ट फोन का गं आई?
अरे बाबा तुझ्यापुढे तर मी आता हातच टेकले. कसं सांगू तुला? पुस्तक ••• पुस्तक•••म्हणजे बुक बुक•••
अगं आई तेच की मग. टिचरच्या स्मार्ट फोन मधे eBook असते त्यातूनच तर आम्ही learn करतो ना?
अरे राजा ते नाही रेऽऽऽऽऽ
आईने बरीच शोधाशोध करून रद्दीतून एक पुस्तक काढून आणले आणि दाखवले. बघ बाळा याला म्हणतात पुस्तक•••
ईऽऽऽऽऽऽऽ असले पुस्तक? किती हेवी ना? असले घेऊन फिरायचे? यातून रीड करायचे? त्यापेक्षा माझा मोबाईलच चांगलाय की. काही वजन नको ओझं नको आणि कॅरी करायला इझी. शोधायला इझी रिफर करायला इझी.
अरे बाळा पण अशी पुस्तके हे वैभव असतात. पिढ्यानुपिढ्या हा खजिना राहू शकतो.
आई राहू दे गं तुझा मोठेपणा तुझ्यापाशीच. तुम्ही पुस्तक पुस्तक केलं आणी आता पुस्तक डे साजरा करता. आता आम्ही पण मोबाईल डे साजरा करणार!!
काय करायचं? हा प्रश्नच असला तरी बदलणार्या युगातही पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!!
☆
© वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




