प्रा.भारती जोगी

? विविधा ?

☆ “१५ आक्टोबर… वाचन प्रेरणा दिन…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

📕📖📗📖📘📖📙

वाचून वाचावयास सांगावे , वाचून वाचवावे
वाचल्याविण वाचाल कैसे सभ्य जन हो
जो वाचतो तोच वाचतो, वाचून दुस-यास वाचवतो
वाचणे वाचवण्यासाठी मन दृढ राहो. ||

-सुहास रघुनाथ पंडित, सांगली.

१५ ऑक्टोबर.! भारत रत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस. तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने….

रांगेत ठेवलेल्या पुस्तकांची पाने फडफडू लागली

अचानक हवा दार ढकलून थेट आत घुसली

हवे सारखी तू ही कधीतरी इथे ये -जा कर ना!

शांता शेळके

कपाटातले पुस्तक म्हणते, बंंधो झटक ना माझी धूळ

बाजूला सार तुझे ते यंत्रा-तंत्राचे प्रचंड खूळ

वाट पहातो तुझ्या भेटीची, मित्रा श्वास इथे कोंडतो

लडिवाळशा स्पर्शाची स्वप्ने कधीची मी रचतो!

मंडळी, ही साद आहे पुस्तकांची! विनंती वजा आर्जव आहे, कैफियत आहे!! विचार करून बघा की… ज्या पुस्तकांना स्पर्श करावा, त्यांच्याच संगतीत तासन् तास घालवू बघणारे आपण… आता तीच पुस्तके आपल्या एका स्पर्शासाठी व्याकुळली आहेत. आसुसलेली आहेत. धूळ त्याच्या वर ही साचली आहे आणि आपल्या मनावर ही बहुतेक!

कारण जी पुस्तके स्वतः च एक प्रेरणा होती, त्यांना उघडून वाचन करणे ही आपली एक अत:प्रेरणा होती. कुठे गेली ती? बदलत्या कालौघात वाहून जाते आहे की काय? हा विचार व्हायलाच हवा.

तंत्रज्ञान आले आणि सोशल मिडिया ची अलिबाबा ची गुहाच उघडली आपल्यासमोर. डोळे दिपले… आणि त्या झगमगाटाच्या तेजाने जणू झापडंच आली डोळ्यांवर. आणि हळूहळू आपला कासीम होणार की काय? अशी भिती वाटायला लागली आहे. या भयापासून योग्य अशा मार्गाकडे नेणारा मार्ग आहे… वाचन!!

“सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पाना-पानातून जातो”!

विसरू नका त्या पुस्तकांसाठी राजगृह बांधणा-या महामानवाला! आठवण करून द्या आजच्या भावी पिढीला त्या… तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीची… ज्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच स्वतः ला एक नियम घालून घेतला होता की… जेवढं वय तेवढी पुस्तके वाचायची!!

आणि ते आयुष्याच्या अंतापर्यंत, वयाच्या नव्वदी पर्यंत एक अतृप्त, अस्वस्थ वाचक म्हणूनच जगले. मृत्यूच्या अंतिम क्षणी त्यांच्या छातीवर उपडे पडलेले पुस्तक हेच सांगत होते,

माणसाला अंत आहे, वाचनाला नाही!

हे आहेत वाचन प्रेरणा देणारे खरेखुरे आयकॉन्स! आयडॉल्स!!

आज बदलत्या काळाबरोबर धावतांना, सोशल मिडियाचे बोट धरून चालतांना, आपला पुस्तकांचा धरलेला हात कधी, कसा सुटतच गेला. वाचनाची साधने बदलली. , माध्यम बदललं. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग… यांनी आपल्या तना-मनाला व्यापून टाकलं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,

कक्षा, आयाम नवे आले, माध्यम बदलले तरी वाड्मय जिवंत राहिले.

या जिवंत वाड्मयाला ख-या अर्थाने अ-क्षर ठेवण्यासाठी आपल्याला वाचन चळवळ उभी करून, वाचकांचा सहभाग वाढवून, सुजाण वाचक घडवता कसे येतील हे बघितलेच गेले पाहिजे. वाचनाची प्रेरणा देणारे संस्कार देणारी संस्कृती रूजली पाहिजे, पाझरली पाहिजे… उतरली पाहिजे मना-मनात थेट… ” आंखोंसे जो उतरी है दिल में “… अशीच!!

वाचाल तर वाचाल… हे घोषवाक्य म्हणजे फक्त घोषणा न राहता, जीवनाच्या पाठ्यपुस्तकातला धडा ठरला पाहिजे, बोध मिळाला पाहिजे, घेतला पाहिजे त्यातून.

या घोष वाक्याचा मतितार्थ थेट भिडला पाहिजे.

वाचाल तर वाचाल याचा अर्थ…

वाचाल तर फुलाल

वाचाल तर शिकाल

वाचाल तर जगाल

असा समजून घेण्याची प्रेरणा दिली ही गेली पाहिजे आणि आपल्या अंत:प्रेरणेने ती घेता ही आली पाहिजे.

अगदी असं झालं पाहिजे की,

“लिहिणा-याने लिहित जावे

वाचणा-याने वाचत जावे

कधीतरी… वाचणा-याने लिहिणा-याचे शब्द घ्यावे! “

वाचनात इतकं सातत्य हवे की ते शब्द आपल्यासाठी.. सुरेश भट म्हणतात तसे… “पाहिले मी एवढे की, पाहणे सौंदर्य झाले.”… अगदी तसेच… वाचले मी इतके की, वाचणे सौंदर्य झाले!! इतकी एकात्मिक भावना वाचनाबद्दल प्रेरित व्हायला हवी.

वाचन तुम्ही ई-बुक, किंडल, मोबाईल, कशातून ही करा… पुस्तकांच्या फिरत्या, पलटत्या पानांशी असलेली मैत्री मात्र तुटू देऊ नका.

मातीला जसा एक पवित्र, धुंध करणारा सुगंध असतो ना, अंगचाच… अगदी तसाच गंध असतो पुस्तकाच्या पाना-पानातून दरवळणारा… ज्याच्या बद्दल गुलजार म्हणतात..

“जबांपर जायका आता था जो उंगली से पन्ने पलटनेका,

वो एक क्लिक से एक झपकी मे नहीं आता “!!!

आजच्या या वाचन प्रेरणा दिनी…

“पुस्तकाचे तुज| काय सांगू महत्त्व|

अक्षराचे एकत्व अंतरीचे||

वैखरीस यावा | लिपीचा आकार|

परेचा ओंकार| अनंत कोटी||

म्हणून एकच प्रण करू या…

वाचनाने आपुले, भरून जावो मन,

संतांचे अक्षर मनी राहो!!

तुका ज्ञानियाचा लागो जीवा छंद

विश्वशांती आनंद, विश्वा नांदो!!! 🙏🙏 

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted