image_print

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ६ ऑगस्ट – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दत्तात्रय पांडुरंग खांबेटे

द. पां. खांबेटे यांनी मराठी साहित्यात वेगळ्या प्रकारचे म्हणजे युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परमाणूशास्त्र यासह अध्यात्म आणि भविष्य या विषयांवर लेखन केले आहे. शिवाय अनेक वर्षे ते हंस, मोहिनी व नवल या मासिकांत नियमितपणे दरमहा लेखन करत होते.

सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू, के. दत्त, प्रज्ञानंद, अवधूत आंजर्लेकर ही त्यांची लेखनातील टोपणनावे.

निवडक साहित्य:

आटप, अरे आटप लवकर-रहस्यकथा

माझं नाव रमाकांत वालावलकर.

दहा निळे पुरूष. . विज्ञान काल्पनिक

चंद्रावरचा खून. . गूढ कथा

न्यूनगंड. . . मानसशास्त्र

वयाच्या 71 व्या वर्षी 1983 मध्ये त्यांचे निधन झाले.🙏

☆☆☆☆☆

महमहोपाध्याय डाॅ. ब्रह्मानंद देशपांडे

डाॅ. ब्रह्मानंद देशपांडे हे प्रसिद्ध वक्ते, इतिहास संशोधक व महानुभाव पंथाचे अभ्यासक होते. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,गुजराती, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी व छत्तीसगढी अशा दहा भाषा येत होत्या. शिवाय ब्राह्मि, फारसी आणि मोडी लिपीचे ते तज्ञ होते.

महानुभाव या मासिकाचे ते कार्यकारी संपादक होते. त्यांचे दिडशेहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आकाशवाणीवर अनेक रूपके, परीक्षणे सादर केली आहेत. महानुभाव व जैन साहित्याचे ते अभ्यासक होते.

त्यांचे चौतिसहून अधिक संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी काही असे:

इये नाथांचिये नगरी, चक्रपाणी चिंतन, देवगिरीचे यादव, रत्नमाला स्तोत्र, शब्दवेध, सप्तपर्णी, लिळाचरित्र  एकांक इत्यादी.

प्राप्त सन्मान :

18वी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, श्रीगोंदे चे अध्यक्ष.

‘देवगिरीचे यादव’ ला महा. राज्याचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार

‘रत्नमाला स्तोत्र’ ला महानुभाव विश्वभारती पुरस्कार

दिवाकर रावते भूमिपूत्र पुरस्कार

संत साहित्य संशोधन पुरस्कार

उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना महामहोपाध्याय ही पदवी प्रदान करण्यात आली होती.

वयाच्या 73व्या वर्षी 2013 मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. 🙏

☆☆☆☆☆

कृष्णशास्त्री राजवाडे

कृष्णशास्त्री हे साहित्य व अलंकारशास्त्र ह्या विषयांचे अभ्यासक व अध्यापक होते. ब्रिटिश काळात त्यांची शिक्षण खात्याच्या भाषांतर विभागात नेमणूक झाली. (1856). अलंकारविवेक हा त्यांचा उल्लेखनिय ग्रंथ. यात संस्कृतातील अलंकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. मराठी रचनांच्या संदर्भासह व उदाहरणांसह हा ग्रंथ असल्यामुळे संस्कृत साहित्य मराठीत आणण्याचा हा पहिला प्रयत्न ठरतो.

त्यांनी मालतीमाधव, मुद्राराक्षस, शाकुंतल, महावीरचरित या नाटकांचे मराठी अनुवाद केले आहेत. ऋतुवर्णन आणि उत्सवप्रकाश ही काव्ये रचली आहेत.

पुणे येथे 1885 साली भरलेल्या दुस-या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

1820 ते 1901 हा त्यांचा कालखंड. वयाच्या 81 व्या वर्षी ते पुणे येथे निवर्तले.🙏

☆☆☆☆☆

लक्ष्मण लोंढे

मराठी साहित्यात विज्ञान कथा लेखन करण्-या लेखकांतील आघाडीचे लेखक !

वयाच्या 50 व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्विकारून पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनासाठी दिला.

‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात त्यांची दुसरा आईनस्टाईन ही कथा इंग्रजीत प्रसिद्ध झाली. या कथेला जागतिक सर्वोत्कृष्ट कथा हा पुरस्कार कन्सास विद्यापिठाकडून मिळाला. जगातील निवडक विज्ञान कथांमध्येही या कथेची निवड झाली. मराठी लेखकाला हा सन्मान प्रथमच मिळाला होता.

लक्ष्मण लोंढे यांचे प्रकाशित साहित्य:

अस घडली नाही. . . कादंबरी

आणि वसंत पुन्हा बहरला

कारकीर्द

काउंट डाऊन

गुंता

थॅक यू मि. फॅरेड

दुसरा आईनस्टाईन

धर्मयोद्धा, लक्ष्मण उवाच, लक्ष्मण झुला, वाळूचे गाणे इत्यादी

प्राप्त पुरस्कार: शांताराम कथा पुरस्कार

लक्ष्मण लोंढे यांचे 2015 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले.

मराठी साहित्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेखन व संशोधन केलेल्या या चारही साहित्यिकांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या कार्यास व स्मृतीस नम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, मराठी विश्वकोश, विकीवॅन्ड.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments