सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. ज्योती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे, आयोजित, साखळी चित्र काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योती कुळकर्णी यांनी तीन चित्र काव्ये सादर केली होती. या तीन कव्यांसाठी त्यांना स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ. ज्योती कुळकर्णी यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!💐💐
पुरस्कार प्राप्त कविता ‘शिवरूप दत्त स्तवन‘ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “शिवरूप दत्त स्तवन” ☆ सौ. ज्योती कुलकर्णी ☆
(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित साखळी चित्र काव्य लेखन स्पर्धेत – तृतीय पारितोषिक प्राप्त)
(पादाकुलक वृत)
☆
अत्रीनंदन दत्ताच्या या
नमन करीते शिवरूपाला
मातृत्वाने या देवांच्या
सतीत्व ओळख अनसूयेला
*
श्रीदत्तगुरू अन विश्वगुरू
हाती त्याच्या चक्र सुदर्शन
सदा सर्वदा खल निर्दालन
देवाला या त्रिवार वंदन
*
त्रिशूल मानक त्रय गुण धारी
स्फटिक माळ ही करी शोभली
कमंडलूधर ईश्वर योगी
रुद्राक्षाची माळ घातली
*
त्रैमूर्तीचे दर्शन सुंदर
या जन्माचे सार्थक करते
नटराजाचे शिवतांडव की
न्याय गर्जना जगात घुमते
*
शिवदत्तात्रय कल्याणास्तव
हातामधला शंख फुंकतो
डमरूमधला ध्वनी येथले
उत्पत्ती लय सत्य मांडतो
☆
© सौ. ज्योती कुलकर्णी
अकोला.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार सर
आर्टिकल रेटिंग देणाऱ्या सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏