कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २६९ – विजय साहित्य
☆ काळीज माया…! ☆
वृत्तहरिभगिनी – (३० मात्रा. – ८ ८ ८ ६)
☆
कसा असावा, जोडिदार हा,
तुला सांगतो, ऐक जरा
श्वासाश्वासा, मधे पेरला
अनुभूतीचा बोल खरा.
*
समोर येता, शब्द साखरी
मागे त्याची, टवाळकी
असा नसावा, जोडीदार तो
बोलघेवड्या, कुचाळकी.
*
पारीजातक फुल फुलावे
दिठीत ज्याच्या परोपरी
असा असावा, जोडीदार तो,
संकट येता दूर करी.
*
ओवी आणि शिवी जयाची
ओळख आहे मनांतरी
अशीच जोडी ,सौख्य देतसे
टिकून राही, जनांतरी.
*
ओळख झाली, जमली मैत्री
सहवासाची, ओढ मना
टिपून घेई,काळीज अपुले,
भाव मनीचा, असे कणा.
*
विश्वासाची, अमृत धारा
जोड असे ही, गुणकारी
कधी हासरी,कधी बोचरी,
मैत्री नाते, जपणारी.
*
असो अंतरी, प्रेम काळजी
दया करुणा, कीव नको
एका ताटी, जेवण खासे
मुखी गोडवा, सदा वसो.
*
जोडी असते, जोड मनाची
खोड टाळ तू, दोषांची
रागा लोभा, वरती अपुल्या,
काळीज माया नात्यांची.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





