श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०७
☆ चळलो नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
चकाकणाऱ्या सोन्याला मी फसलो नाही
सुंदर होता जरी पिंजरा भुललो नाही
*
धुंद केवडा त्याच्या भवती साप विषारी
राजकारण्यां सोबत काही रमलो नाही
*
मानवतेचा झेंडा होता हाती माझ्या
सौख्य त्यागले कर्तव्याला चुकलो नाही
*
स्वप्नी रोजच जरी यायची रंभा माझ्या
सारी स्वप्ने फसवी होती चळलो नाही
*
गजल सोबती आहे म्हनूनच कार्यमग्न मी
जरी जगाला तसा फारसा कळलो नाही
*
सुख दुःखाची गाठ भेट तर रोजच होते
दुःख घेउनी कधीच सोबत बसलो नाही
*
पिकले आहे केस जरासे डोक्यावरचे
वय झाले पण तसा मनाने पिकलो नाही
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





