सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. दीप्ती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांनी साहित्य क्षेत्रात तिहेरी यश संपादन केले आहे.
तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांच्या ‘खोल डोहाच्या तळ्यातून’ या काव्य संग्रहास प्राप्त झाला आहे.
तसेच तितिक्षा आयोजित नवरात्री विशेष काव्य लेखन स्पर्धेत त्यांच्या ‘ कुष्माडा ‘ या कवितेस द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तर तितिक्षा च्या काव्य पूर्तता स्पर्धेतही ‘ संदेश कवितेचा ‘ या कवितेस द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
दीप्ती कुलकर्णी यांच्या या यशाबद्दल ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐
पुरस्कार प्राप्त कविता ‘संदेश कवितेचा‘ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “संदेश कवितेचा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
मानवतेचा पथ सजवाया
होवुनिया रांगोळी
माझ्यानंतर शिल्लक मागे,
या कवितेच्या ओळी ||धृ||
*
कवितेची किमया न्यारी,
पवित्रता सदा आगळी
सहिष्णुतेचा मार्ग दाखवी,
एकात्मकता सगळी ||१||
*
शुभसंदेशा पेरत जाई,
सकलां साद जवळी
वेधकतेने मानवतेला, नित्य
दाखवी करांगुळी ||२||
*
रंगसंगती मनाजोगती,
दिसते सर्वची वेळी
प्रतिका दाखवी, शुभचिन्हे
ती प्रेरकता वेळोवेळी| ||३||
*
भाव मनीचे, तेच उमटवी,
आकर्षकता पाळी,
सुंदर कवने सदा खुलविती,
तेजोमयता भाळी ||४||
*
अर्थ जागवी, मना तोषवी,
सकाळी कधी सायंकाळी
कविता ही तर सदा शोभते,
सजते नाना पळी ||५||
*
मुक्तहस्ते कलात्मकता
शुचिर्भूतता ती वेगळी,
निमंत्रिते ती, मना जनांच्या,
हृदया स्पर्शी मोकळी ||६||
*
मानवतेचा मंत्र खरा जो,
संदेशात्मक या ओळी
भावोत्कटता जपते सारी,
कविता रूपी ओळी ||७||
☆
ता. क. :- पाचव्या कडव्यात – सजते नाना पळी, या ओळीत “पळी” म्हणजे ‘ घटका-पळे’ – यातील पळाला हा वेळवाचक शब्द आहे. संध्येची पळी नाही.
© सौ. दीप्ती कुलकर्णी
भ्र. ९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






