श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२३
☆ ओठावरील मोती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
संशय ऋतूस अपुला आला असेल का?
संयम समीप येता ढळला असेल का?
*
डोळ्यात भावनांचा संग्राम पेटला
भात्यात बाण होता सुटला असेल का?
*
तारा नभातुनी हा वेडा खुणावतो
त्याचा तिला इशारा कळला असेल का?
*
ओठावरील मोती नथनी मधील तो
स्पर्शात जीव त्याच्या जडला असेल का?
*
गालात लाजणारा तो चंद्र कालचा
प्रणयात आज पुरता रमला असेल का?
*
तू रंग फेकला मी डागाळले जरा
तो डाग काळजावर ठसला असेल का?
*
ओढून गंध नेतो झाडाकडे मला
मज पाहताच चाफा फुलला असेल का?
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




