कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९५ – विजय साहित्य
☆ सृजन संगत…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
हळवे अंतर
जपता जपता
जाणीव असावी
घडता घडता…! १
*
गिरवा अक्षर
धूळपाटीवर
स्वरादि व्यंजन
मना मनावर…! २
*
जीवन संचित
संस्कार वारसा
जपू मनांतरी
मौलिक आरसा…! ३
*
गरजे पुरती
नसावीत नाती
मनांगणातील
उजळीत वाती…! ४
*
जीव जीवावर
जगतो जडतो
संकट समयी
जगास नडतो…! ५
*
प्रेमळ हृदयी
जाणीव असावी
स्वभाव कस्पटे
मुळीच नसावी…! ६
*
नसावी उणीव
नजरेचा धाक
ऐकू यावी सदा
हृदयाची हाक…! ७
*
असायला हवी
नाराजी शब्दांत
प्रेमाचेच बंध
गुंफलेले त्यात…! ८
*
काका, मामा,नाती
आधाराचे हात
अक्षर धन हे
हवे दिनरात…! ९
*
कमावले किती
जाणीव असावी
प्रेमळ जीवांची
उणीव नसावी …! १०
*
गमावले किती
जाणीव असावी
सृजन संगत
उणीव नसावी…! ११
*
काळाच्याही पुढे
धावणारे मन
उणीव नसावी
आठवांचे क्षण…! १२
*
हिशोबात नको
व्यवहारी माया
झिजवावी प्रेमे
अविरत काया…!१३
*
जाणीव असावी
आपल्या जनांची
उणीव नसावी
प्रेमळ मनांची….! १४
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




